जळगाव, 28 एप्रिल : राज्यात मागील वर्षाच्या अखेरीस महायुती सरकार मोठ्या बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. असे असताना जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून लढलेले गुलाबराव देवकर हे अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगत आहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा देवकरांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
जळगावात मंत्री गुलाबराव पाटील माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, निवडणुकीच्या कालवाधीत देवकरांनी जीडीसीसी बँकेतून 10 कोटी रूपये काढल्याचे बऱ्याच ठिकाणाहून उघडकीस येत आहे. निवडणुकीच्या कालावधीत अचानकपणे श्री कृष्ण संस्थेच्या नावावर असे 10 कोटी रूपये काढणे, मला तरी वाटते, कॅश इन हँड ठेवणे, अतिशय चुकीचे आहे. यामुळे मी निवडणूक आयोग तसेच अँटी करप्शन यांच्याकडे देवकरांची तक्रार करणार आहे. दरम्यान, मला हे माहितीये की, कोणताच पक्ष त्यांना स्विकारणार नाही, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना लगावलाय.
View this post on Instagram
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक, बुलढाणा अर्बन बँक यासारख्या बँकेचे घेतलेले कर्ज न फेडणे, कॉलेजमध्ये जे शिक्षक शिकवत असतील त्या शिक्षकांचे पगार न देणे, त्याचबरोबर प्रशासनाला दबावात आणून कायद्याचे बाहेर जात 26 लाख रूपये भाड्याने ती बिल्डिंग देऊन ठेवलीय. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर ते कोणत्याही पक्षात गेले…तो उनको अंदर जाना है भाई, असा शब्दात गुलाबराव पाटील यांनी देवकरांना डिवचलय. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर जाणे हे चुकीचे होते. हे जनतेने सुद्धा मान्य केले असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव देवकर यांचा पक्षप्रवेश रखडला? –
गुलाबराव देवकर हे माजी मंत्री असून त्यांनी मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, देवकर यांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही महिन्यातच गुलाबराव देवकर यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, एवढे दिवस उलटून गेले असतानाही गुलाबराव पाटील यांचा अजित दादा गटात प्रवेश न झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश रखडला असल्याचे बोलले जात आहे.