मुंबई, 29 जुलै : मुंबई पोलिस दलात कायमस्वरूपी पोलिस भरती होईपर्यंत तीन हजार पोलिसांची भरती महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या माध्यमातून कंत्रीटी पद्धतीने करणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असतानाच राज्यातील होमगार्डसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
होमगार्डसाठी महत्वाचा निर्णय –
राज्यातील गृहरक्षक दलातील जवानांना (होमगार्ड) पुन्हा सलग 180 दिवस म्हणजेच सहा महिने काम मिळणार आहे. याबरोबरच त्यांना कवायत भत्ता देण्याचा तसेच दर 3 वर्षांनी नोंदणी करण्याचा नियम रद्द करणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती विधान परिषदेत दिली.
सलग 180 दिवस काम मिळणार –
गृहरक्षक दलाच्या मागण्यांसदर्भात विधान परिषदेत माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यांवरील आपत्ती, बंदोबस्तावेळी या जवानांचा मोठा आधार लाभतो. त्यामुळे पुन्हा यासाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे गृहरक्षक दलातील जवानांना सलग 180 दिवस काम मिळणार आहे.
आंदोलनाचा दिला होता इशारा –
महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवानांनी 365 दिवस नियमित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. गृहरक्षक दलाच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. गृहरक्षक दलाच्या मागण्यांसंदर्भात आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला.