जळगाव, 21 नोव्हेंबर : दीपनगर भुसावळ येथील महावितरण कार्यालयातील अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय 57, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 नोव्हेंबर रोजी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे 2 लाख 88 हजार 594 रुपयांचे वीज बिल दुरुस्त करणे आणि त्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा अधिकार लाडवंजारी यांच्या अखत्यारीत होता. बिल दुरुस्तीच्या बदल्यात त्यांनी 5 टक्के रकमेची लाच मागितल्याने तक्रारदाराने 19 नोव्हेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी एसीबीने लाडवंजारी यांच्या दीपनगर येथील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यांना एसीबी पथकाने तात्काळ अटक केली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने केली.
लाच प्रकरणाची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल क्र. उपलब्ध –
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार नोंदवणे अधिक सुलभ व्हावे यासाठी नवीन मोबाइल व व्हॉट्सअॅप क्रमांक 7588661064 सुरू केला आहे. या क्रमांकावर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या लाच मागणीसंदर्भात थेट तक्रार नोंदविता येणार असून हा क्रमांक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्याजवळ राहणार आहे.
त्यामुळे नागरीकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारी कामाच्या बदल्यात लोकसेवक किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून लाच मागितल्यास, नागरिकांनी या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे त्वरित कळवावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई होणार






