जळगाव, 14 सप्टेंबर : रामानंद नगर पोलिसांनी पिंप्राळा परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह पकडण्यात यश मिळवले आहे. महेंद्र उर्फ दादु समाधान सपकाळे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस शनिवार 13 सप्टेंबर रोजी जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या सूचनेनुसार गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचदरम्यान, 13 सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ दादु समाधान सपकाळे हा पिंप्राळा हुडको परिसरात हातात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत आहे. या दहशतीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याची माहितीही समोर आली.
गावठी कट्ट्यासह एक जिवंत काडतूस जप्त –
यानंतर गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत सपकाळेचा शोध सुरू केला. दरम्यान, तो पिंप्राळा रोडवरून पळून जात असल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळवले. अखेर खंडेराव नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथकाने त्याला शिताफीने पकडले. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. सपकाळे याच्यावर याआधीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउपनि. सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपूत, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, विनोद सुर्यवंशी व गोविंदा पाटील यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. सचिन रणशेवरे करीत आहेत.