चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 28 डिसेंबर : जळगाव शहरात घडलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून व्यक्तीशः तसेच प्रशासनातर्फे मी सर्वप्रथम भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अपघातस्थळी भरपूर चुका झाल्यात..जर सर्वांना या चुका टाळता आल्या असत्या तर कदाचित ही अपघाताची घटना घडली नसती, असे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जळगावात डंपरच्या धडकेत झालेल्या 9 वर्षीय बालकाच्या मृत्यप्रकरणावर ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’सोबत ते बोलत होते. दरम्यान, भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नये, यासाठी सर्वांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यावर बोलताना जिल्हाधिकारी प्रसाद पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काम सुरू आहे. आधी असलेल्या छोट्या रस्त्यांचे आता चौपद्रीकरण झाल्याने अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्याच्या अंतर्गत असलेले रस्त्यांचे काम पुर्ण करणे आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवणे हे काम करण्यात आल्याचे निर्धारित करण्यात आले होते आणि त्या दिशेने काम देखील सुरू आहे.
दरम्यान, रस्ते अपघातांच्या घटना कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. यामध्ये रस्त्यांवर स्ट्रीट लाईट, ट्रॅफिक लाईट लावणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि गतिरोधक बसविणे यांसारख्या कामांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.
जिल्हाधिकारी प्रसाद यांचे नागरिकांना आवाहन –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वाढत्या अपघाताच्या घटना घडत असल्याने नागरिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, जास्त अपघाताच्या घटना दुचाकी वाहनांच्या असतात. म्हणून माझी नागरिकांना विनंती आहे की, सर्वांनी कुठल्याही परिस्थितीत दुचाकीवरून ट्रीपल शीट प्रवास करू नये. आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. अपघातांच्या घटना ज्याठिकाणी घडतात. त्याठिकाणी सावधपणे वाहन चालवणे गरजेचे आहे. वेगमर्यादा लक्षात घेऊन वाहन चालवले पाहिजे.
वाळू तस्करीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
जळगाव जिल्ह्यात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते. वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगाने जातात, यामुळे नागरिकांमध्ये संताप तसेच तीव्र नाराजी आणि याबाबतच्या तक्रार देखील आहेत. यावर बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, वाळू तस्करीविरोधात सर्वात जास्त जर कारवाई करणारा जिल्हा असेल तर तो जळगाव जिल्हा. खरंतर, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करांकडून हल्ले झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. सीसीटीव्हीमध्ये डंपरचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात आली.
वाळू तस्करांविरोधात कारवाई करताना असे दिसून आले की, आधी दिवसा वाळूची तस्करी व्हायची तर आता रात्री वाळू तस्करी केली जातेय. दुसरा मुद्दा म्हणजे अधिकारी-कर्मचारी वाळू वाहणाऱ्या वाहनचालकांना थांबवतात. मात्र, ते स्पीडमध्ये पुढे निघून जातात. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सीसीटीद्वारे वाहनांचा शोध घेतला तर ते आता वाहनाच्या नंबरप्लेटमध्ये बदल करतात. अशापद्धतीने क्रिमिनल माईंडने वाळू तस्करी केली जातेए. असे असतानाही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. परंतु, आता यापुढे जे कुठेही विना नंबरप्लेटचे वाहन सापडले तर त्याविरोधात कडक कारवाई करा, असे स्पष्ट आदेश आरटीओ आणि पोलीस विभागाला देण्यात आले आहेत.
वाळू तस्करांविरोधात कारवाई केली जात असताना अधिकारी-कर्माचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. मात्र, तरी देखील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिंमतीने कारवाया केल्यात. एका वर्षांत 800 वाहने जप्त करण्यात आले. एमपीडीएच्या कारवाया करण्यात आल्या. अशापद्धतीने कारवाया करण्यात आल्या असताना यामध्ये काही प्रमाणात आळा बसला असेल. मात्र, जनतेची अपेक्षा लक्षात घेता यावर अजूनही मेहनत घेण्याची गरज असून प्रशासन येत्या काळात मोठ्या हिंमतीने कारवाई करणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला.
हेही पाहा : Dr. Dnyaneshwar Mulay ओडिशाच्या निलिमारांनी साहित्य पुरस्काराचे मानकरी, Exclusive Interview