जळगाव, 31 जुलै : महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 29 जुलैपर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 142 शेतकरी सहभागी झाले आहेत.
मुदत वाढवली –
पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी 3 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवून दिली आहे. याआधी 31 जुलै ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आता ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेत लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टी, अवकाळ, दुष्काळ या नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत अन्नदाता शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन घेतो, आपत्तीच्या काळात शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली. केंद्र, राज्य सरकार आणि शेतकरी यांचा समायीक हिस्सा पीक विमा योजनेसाठी होता. मात्र, 2023च्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देण्याच निर्णय घेतला.
आता 3 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. 29 जुलैपर्यंत जिल्ह्यातील 11 हजार 429 कर्जदार आणि 3 लाख 21 हजार 713 बिगर कर्जदार अशा एकूण 3 लाख 33 हजार 142 शेतकऱ्यांनी 3 लाख 39 हजार 76 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचा विमा उतरवला आहे.
कृषीच्या नाशिक विभागांतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. यात नाशिकमध्ये – 330562, धुळे – 155764, नंदुरबार – 88117 व जळगाव – 333142 शेतकऱ्यांनी पीक योजनेत सहभाग नोंदवला आहे. जळगाव जिल्हा नाशिक विभागात अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील एक रूपयात पीक विमा पोटी 1316.07 कोटी रूपये रक्कम संरक्षित करण्यात आली आहे.
मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 586 शेतकरी सहभागी झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण 168.61 टक्के आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगावचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल, सध्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा जागर करण्यात आला.