जळगाव, 5 सप्टेंबर : जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षण अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन कार्यवाही पार पडली आहे. या प्रक्रियेत एकूण 164 विशेष शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन करून त्यांना योग्य शाळांत पदस्थापना देण्यात येणार आहे.
ही कार्यवाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) चंद्रशेखर जगताप यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. प्राथमिक शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा प्रभावीपणे पूर्ण करणे तसेच शिक्षकांचा ताळमेळ साधून आवश्यक तेवढ्या शिक्षकांची उपलब्धता करून देणे हा या समुपदेशनाचा मुख्य उद्देश होता.
या प्रक्रियेमुळे विशेष शिक्षकांची कमतरता भासत असलेल्या शाळांना दिलासा मिळणार असून दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.