जळगाव, 6 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील महिला जळगावात न्यायालयीन कामानिमित्त आल्यानंतर त्यांनी गोयल ज्वेलर्समध्ये दुकानातून दागिने लांबविल्याची घटना 28 जानेवारी रोजी घडली होती. दरम्यान, शनीपेठ हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी महिलांचा माग काढत त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून एक लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सराफ बाजार पेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल (वय 69) यांच्या गोयल ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिलांनी 28 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुकानातून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते. दरम्यान, याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात देखील कैद होता.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आल्यानंतर संशयीत महिला चोरी करून सुभाष चौक, घानेकर चौकातून पायी जात असल्याचे आढळले. त्यानंतर त्या बळीराम पेठ परिसरात एका वाहनात बसताना दिसल्या.
दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक (एम.एच.14 डी.एफ.5703) असल्याचे निष्पन्न होताच चालक आसीफ मो.रफिक अहमद अन्सारी (22, रा. मालेगाव, जि. नाशिक) याच्याशी संपर्क साधला असता त्याने 28 जानेवारी रोजी सईदा रहमतुल्ला अन्सारी (41) व इरफाना बानो अल्लाह बक्ष शेख (44, मालेगाव) या दोन महिलांना जळगाव येथे भाड्याच्या गाडीने आणल्याची माहिती दिली.
आरोपी महिलांकडून सोन्याचे दागिने जप्त –
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही महिलांना मालेगावातून अटक करीत त्यांच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. या दोन्ही महिलांवर यापूर्वीही विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून महिला न्यायालयीन कामानिमित्त जळगावी आल्या व परतीच्या मार्गावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही महिलांची अधिक चौकशी केली असता दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे चोरीचे 7 गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती समोर आली आहे.या पथकाने केली कारवाई –
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक साजीद मंसुरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार विजय खैरे, नाईक किरण वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, काजल सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत