जळगाव, 8 एप्रिल: राज्यात अधिकाऱ्यांच्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असताना सामान्य प्रशासन विभागाकडून आणखी 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) मुंबई येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिनल करनवाल यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेची उल्लेखनीय कामगिरी –
मिनल करनवाल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2019 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार हाती घेतला. दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेला तब्बल 12 वर्षांनी जळगाव जिल्हा परिषदेला आएएस अधिकारी मिनल करनवाल यांच्या रुपाने महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाल्या. गेल्या वर्षभराच्या काळात मिनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषदेने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, तसेच नागरिकाभिमुख सेवा वितरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
“सेवाकर्मी प्लस” उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांकडून नुकताच गौरव –
शासकीय कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणणे, शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढविणे तसेच नागरिकांना अधिक लोकाभिमुख व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या “सेवाकर्मी प्लस” या विशेष उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच, भविष्यातही नागरिकांना अधिक सक्षम व पारदर्शक सेवा देण्यास या सन्मानामुळे प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
करिश्मा नायर असतील नव्या CEO –
करिश्मा नायर या २०२१ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी २०२० च्या यूपीएससी परीक्षेत देशात १४ वी रँक मिळवली होती. मुंबईत शिक्षण घेतलेल्या करिश्मा नायर सध्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, त्यांच्या बदलीचे आदेश जारी झाले असून, त्यांची नियुक्ती जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर करण्यात आली आहे. विद्यमान सीईओ मिनल करनवाल यांच्या जागी त्या लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
राज्यातील 11 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या –
- राहुल रंजन महिवाल (आयएएस:आरआर:2005), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
- श्वेता सिंघल (आयएएस:आरआर:2009) यांची विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.
- रुचेश जयवंशी (आयएएस:आरआर:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
- कन्हूराज बागटे (आयएएस:एससीएस:2011) यांची सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, कल्याण येथे बदली करण्यात आली आहे.
- लक्ष्मण राऊत (आयएएस:एससीएस:2015), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
- गीतांजली बाविस्कर (आयएएस:एससीएस:2015), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
- डॉ. दिलीप जगदाळे (आयएएस:एससीएस:2015), सह व्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, कल्याण यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
- पंकज देवरे (आयएएस:एससीएस:2016) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे बदली झाली आहे.
- मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- करिश्मा नायर (IAS:RR:2021) अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- अमित रंजन (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.






