जळगाव, 15 ऑगस्ट : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त तोंडी बोलून नाही तर कृतीशील काम करून महिलांच्या प्रगतीसाठी अत्यंत सुबक आणि नावीन्यपूर्ण महिला व बालकल्याण भवन जिल्हा नियोजनच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आले आहे. राज्यात रोल मॉडेल ठरेल असे हे बांधकाम असून, आता महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेली सात विभाग एका छताखाली जोमाने काम करतील, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
महिला व बालकल्याण भवनचे लोकार्पण –
जळगाव शहरातील महाबळ रोडवर बांधलेल्या महिला व बालकल्याण भवनचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कार्यकारी अभियंता आर. बी. पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रफिक तडवी यांसह मान्यवर उपस्थित होते.
शासन महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, जिल्हा नियोजनातून जिल्ह्यात अकरा ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना हक्काची शाश्वत जागा मिळणार असून 12 महिने उत्पन्न मिळवून देणारे स्रोत उपलब्ध होतील. जागतिक महिला दिनी या इमारतीच्या भूमिपूजनाची कुदळ पालकमंत्र्यांच्या हस्ते मारली गेली होती, तर केवळ अठरा महिन्यांत हे सुसज्ज भवन उभे राहिले. लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणे, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
View this post on Instagram
या सुसज्ज भवनामध्ये एकूण सात कार्यालये कार्यान्वित झाली आहेत – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव शहरी प्रकल्प, बालविकास प्रकल्प अधिकारी दक्षिण प्रकल्प, जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि ‘चाईल्ड लाईन’.
कारागिरांच्या कौशल्याचा गौरव –
पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा ) भोळे यांच्या हस्ते हे सुंदर भवन ज्या कारागिरांच्या कौशल्यपूर्ण हातानी साकारले त्या सर्वांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला.