जळगाव, 7 ऑगस्ट : जिल्ह्यात जुनमध्ये सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्यानंतर जुलैमध्ये कमी-मध्यम स्वरूपाचा सर्वत्र पाऊस झाला आहे. यादरम्यान जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील 95 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आज अखेरपर्यंत 7 लाख 38 हजार 520 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर खान्देशचे पीक म्हणून ओळख असणाऱ्या कापसाच्या 5 लाख 7 हजार 80 हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत.
जुलै महिन्यात पेरण्यांना गती –
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र 7 लाख 69 हजार 601 हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिना हा कोरडा गेला आहे. कापूस लागवडीस उशीर झाला मात्र जुलैपासून महिन्यांपासून चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन , इतर गळीतधान्य, कापूस तसेच नवीन ऊस पिकाची लागवड ही केली जाते.
जिल्ह्यात खरीप हंगाम ऊस पिक वगळून 73 लाख 46 हजार 606 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर नवीन ऊस पिक लागवडीसह 7 लाख 38 हजार 520 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कापसाखालोखाल मका – 86 हजार 199 हेक्टर क्षेत्रावर, ज्वारी- 20 हजार 762, सोयाबीन – 17 हजार 718, उडीद – 14 हजार 758, तूर -10 हजार 825 , मूग – 13 हजार 787, बाजरी – 7 हजार 854, नवीन ऊस लागवड – 3 हजार 914, इतर तृणधान्य – 2360, भुईमूग – 900, इतर कडधान्य – 464 , तीळ – 174, सूर्यफूल – 14 व इतर गळीतधान्य 11 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.