मुंबई, 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच दिवाळीआधी लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे.
सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा 410 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केल्याने कालपासून सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ही दिवाळी भेट मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
ई-केवायसी न केलेल्या महिलांनाही मिळणार लाभ –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीय. दरम्यान, लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी असलेल्या ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक –
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात असून आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पण, ई-केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc यावरच केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहे. दरम्यान, अनेक महिलांना ई-केवायसीसाठी अडचणी निर्माण होत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.