चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
अकोला, 29 एप्रिल : परिस्थिती कशीही असो, तिच्यासोबत लढण्यासाठी प्रयत्नांसह संयमाची साथ दिली तर त्यावर निश्चित मात करता येते आणि यश गाठता येते. याचेच एक उदाहरण म्हणजे लक्ष्मी चक्रनारायण होय. लक्ष्मी मच्छिंद्र चक्रनारायण या तरूणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. या पार्श्वभूमीवर तिच्या यशाचा प्रवासाबद्दल ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’ने लक्ष्मीची विशेष मुलाखत घेतली.
काय आहे संपूर्ण बातमी? –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निकाल जाहीर केला. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर तालुक्यातील जामठी बु. येथील रहिवासी लक्ष्मी चक्रनारायण या तरूणीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवत, अभ्यासाला स्मार्ट वर्कची जोड देत संयमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. दरम्यान, पीएसआयपदी निवड होण्यापुर्वी लक्ष्मीची मे 2023 मध्ये पोलीस शिपाईपदी निवड झाली. यानिमित्ताने फेब्रुवारी महिन्यापासून तिचे सध्या अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू आहे.
लक्ष्मीची कौटुंबिक पार्श्वभूमी –
लक्ष्मीचा तिच्यासह चार बहिण आणि एक भाऊ व आई असा परिवार आहे. तिची आई वेणूताई ही शेतकरी असून वडिलांचे 2018 साली निधन झाले. मात्र, वडिलांच्या निधनाने खचून न जाता स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासात संयमासह सातत्य ठेवत तिने पीएसआय पदाला गवसणी घातली. तसेच लक्ष्मीचा मोठा भाऊ प्रविण सैन्य दलात (ARMY) डॉक्टर असून मोठी बहिण शितल पोलिस विभागात आहे. तसेच लहाण दोघी बहिणींपैकी एक बहिण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) असून एक बहिण बँकिंगच्या परिक्षेसाठी तयारी करत आहेत.
लक्ष्मी विज्ञान शाखेत पदवी उत्तीर्ण –
लक्ष्मीचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. यानंतर तिने माध्यम शिक्षण जवाहर विद्यालयातून पुर्ण केले. तसेच 12 वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून वसंतराव नाईक विद्यालय, मुर्तिजापुर येथे पुर्ण झाले. तर मुर्तिजापूर येथील डॉ. आर.जी. राठोड विद्यालयातून तिने विज्ञान शाखेतून पदवी संपादित केली. यानंतर लक्ष्मी ही स्पर्धा परिक्षेकडे वळली.
स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासास केली सुरूवात –
सुरूवातीला आईचे आजारपण आणि वडिलांना पॅरालिसिसचा झटका आल्याने ते साधारणतः चार वर्ष अंथरूणावर होते. या सर्व परिस्थितीत मोठे भाऊ व बहिण नोकरीनिमित्त घराबाहेर असल्याने लक्ष्मीला तिच्या आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागली. म्हणून मध्यतंरी आलेल्या कौटुंबिक समस्यांमुळे तिला स्पर्धा परिक्षेचा अभ्यास थांबवावा लागला. मात्र, या सर्व परिस्थितीतून बाहेर येत तिने 2018 सालापासून पुर्णवेळ स्पर्धा परिक्षेची तयार सुरू केली. यामध्ये सुरूवातीला सेल्फ स्टडी केला. तसेच 2020 साली अमरावती येथे विदर्भ आयएएस अॅकाडमीमध्ये क्लास जॉईन केला. यासह तिने रिंडिंगमध्ये अभ्यास करत स्वप्नांच्या दिशेने प्रयत्नास सुरूवात केली.
लक्ष्मीची पीएसआयपदी निवड –
लक्ष्मीने स्पर्धा परिक्षेचा अभ्यासास सुरूवात केल्यानंतर तिला सुरूवातीला अपयशाचा सामना करावा लागत होता. यानंतर तिने अपयशाचे विश्लेषण करत अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला आणि स्मार्ट स्टडी संकल्पनेचा वापर करत राज्यसेवा संयुक्त परिक्षा 2021 (MPSC Combined 2022) पुर्व परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर जुलै 2022 मध्ये झालेली मुख्य परिक्षा उत्तीर्ण करत शारिरीक चाचणी व मुलाखतीत यश मिळवले. लक्ष्मीने पीएसआयच्या परीक्षेत मुलाखतीसह एकूण 210 मार्क्स मिळवत एससी महिला प्रवर्गातून राज्यातून 7 वी रँक प्राप्त केली आणि पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. दरम्यान, गावातील पहिली महिला पीएसआय ठरल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
पीएसआयसाठी नेमकी कशी तयारी केली? –
पीएसआय पदापर्यंत निवड होण्याच्या प्रवासाबद्दल लक्ष्मी म्हणाली की, सर्वप्रथम धांडे सरांनी मला स्पर्धा परिक्षा करण्याचे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर आतापर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मला यशापासून दुर रहावे लागत होते. यानंतर आयोगाला काय नेमकं अपेक्षित आहे, याकडे मी सखोलपद्धतीने लक्ष देत अभ्यासात स्मार्ट स्टडी संकल्पनेचा वापर केला. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणिं आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते, या बाबींकडे लक्ष दिले. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असताना साधारणतः 8 ते 10 तास नियोजनबद्ध अभ्यास केला असल्याचे लक्ष्मीने सांगितले. वाचन, प्रश्नपत्रिकांचा सराव, शारिरीक चाचणीचा सराव आणि उजळणी याचा अभ्यासात समावेश असायचा, असेही तिने सांगितले.
पीएसआयपदी निवड झाल्यानंतरच्या भावना –
पीएसआयपदी निवड झाल्यानंतरच्या भावनेबाबत लक्ष्मीने बोलताना सांगितले की, एवढ्या मोठ्या स्पर्धेत चांगल्या पद्धतीने स्वतःला परफॉर्म केल्यानंतर आपण पीएसआय होऊ असा स्वतःवर विश्वास होता. मात्र, अंतिम निवड होईपर्यंत संयम महत्वाचा होता आणि ज्यावेळी माझे अंतिम यादीत नाव आले तेव्हा खूप मोठा आनंद झाला. यामध्ये माझ्या आई व बहिणींनी दिलेली भावनिक व आर्थिक साथ अत्यंत महत्वाची आहे. मागील पाच वर्षांपासून स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना प्रत्येक वेळी मला अपयश येत होते. तर दुसरीकडे माझे जसजसे वय वाढत होते, तसे आव्हान वाढत होते. मात्र, माझ्या कुटुंबियांनी माझा आत्मविश्वास वाढविल्याने मी हे यश मिळवू शकले. दरम्यान, लक्ष्मीच्या मोठी बहिण ह्या सध्या यवतमाळ जिल्ह्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर माझ्यासाठी माझी मोठी बहिणच माझी प्रेरणास्थान असल्याचे लक्ष्मीने सांगितले. तसेच मला माझ्या ताई व पाहुण्यांनी सहकार्य केल्याचे लक्ष्मीने सांगितले.
तरूणाईला दिला मोलाचा सल्ला –
स्पर्धा परिक्षेत यश मिळवायचे असेल तर संयम फार महत्वाचा आहे. स्पर्धा परिक्षांसाठी सतत नियोजन करणे व स्मार्ट अभ्यास गरजेचा आहे. यासह योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाठी उपयुक्त पुस्तके व नोट्सची निवड महत्वाची आहे. ज्यावेळी आपण यशाच्या जवळ असतो, त्यावेळी अनेक सारे अडथळे निर्माण होत असतात. मात्र, तरूणांनी शेवटपर्यंत हार न मानता संयम बाळगल्यास नक्कीच त्यामध्ये यश मिळू शकते, असा मोलाचा सल्ला लक्ष्मीने दिला.
सोशल मीडियावरील स्क्रोलिंगपासून दूर राहिले पाहिजे –
लक्ष्मीने सोशल मीडियाच्या वापराबाबत सांगितले की, सोशल मीडियाचा वापर हा सकारात्मक व नकारात्मक अशा दोघं पद्धतींचा आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी आजच्या स्थितीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नोट्स वैगेरे उपलब्ध आहेत. मात्र, तरूणांनी सोशल मीडियात गुंतून न राहता कमीत कमी वेळ त्याचा वापर केला पाहिजे. सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत करत तरूणांचे तासंतास वाया जातात. यामुळे तरूणांना सोशल मीडियाचे व्यसन लागल्याचे दिसून येते. यासाठी तरूणांनी या स्क्रोलिंगपासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला लक्ष्मीने तरूणांसाठी दिला.
हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI