पाचोरा, 3 एप्रिल: महसूल प्रशासन अधिक गतिमान व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते 21 लॅपटॉप व 61 प्रिंटरचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत तसेच नायब तहसीलदार (महसूल) प्रमोद मोरे उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी डिजिटल साधनांमुळे महसूल कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक होणार असल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे आणि तहसीलदार विजय बनसोडे यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना या उपकरणांचा प्रभावी वापर करून नागरिकांना जलद सेवा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांनी केले. तसेच मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या वतीने विनोद कुमावत यांनी पाचोरा तालुक्यासाठी लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आभार मानले.






