जळगाव, 16 ऑक्टोबर : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोलपंपवर दरोडा पडल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान, मुक्ताईनगर तसेच वरणगाव परिसरात झालेल्या सशस्त्र पेट्रोल पंप दरोड्याचा गंभीर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीतील सहा संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नेमकं प्रकरण काय? –
मुक्ताईनगरच्या बोदवड चौफुलीजवळील ‘रक्षा टोफ्युअल’, कर्की फाट्यावरील ‘मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप’ आणि वरणगाव शिवारातील ‘सय्यद पेट्रोल पंप’ येथे 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 11 दरम्यान पाच ते सहा अज्ञातांनी बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकला होता. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, घटनेच्या सखोल तपासासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुक्ताईनगर, वरणगाव, नाशिक आणि अकोला परिसरात शोध मोहीम हाती घेतली.
एलसीबीची मोठी कामगिरी –
स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध मोहिमेत तपास पथकाने फक्त चार दिवसांत नाशिक येथून चार आरोपींना, तर अकोला येथून एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. अटक आरोपींमध्ये भुसावळ, अकोला आणि बुरहानपूर येथील रहिवाशांचा समावेश असून, त्यापैकी सचिन भालेराव हा जिल्ह्यातून यापूर्वीच हद्दपार केलेला गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी यांना केली अटक –
सचिन अरविंद भालेराव (वय 35 रा. भुसावळ ह.मु. खकनार (मध्यप्रदेश)), पंकज मोहन गायकवाड (वय 23 रा. भुसावळ), हर्षल अनिल बावस्कर (वय 21, रा. बाळापूर, अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (वय 23 रा. बाळापूर, अकोला), प्रदुग्न दिनेश विरघट (वय 19 रा. कौलखेड, अकोला), विधिसंघर्षित बालक (अकोला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त –
पोलिसांनी दरोडेखोरांकडून 40 हजार रोख रक्कम, 3 गावठी पिस्तूल, 5 मॅगझीन, 10 जिवंत काडतुसे आणि 9 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 33 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यांनी केली कारवाई –
सदरची कार्यवाही ही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, श्रे. पोउपनि. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, प्रेमचंद सपकाळे, उमाकांत पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रितमकुमार पाटील, सुनिल दामोदरे, विनोद पाटील, यशवंत टहाकळे, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना/ किशोर पाटील, पोकॉ/ईश्वर पाटील, छगन तायडे, रतनहरी गिते, प्रशात परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, सचिन घुगे, मयुर निकम, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, सिध्देश्वर डापकर, प्रदीप सपकाळे, रविंद्र कापडणे, जितेंद्र पाटील, रविंद्र चौधरी, राहुल महाजन, चालक पोहेकों/दिपक चौधरी, पोहेकॉ दर्शन ढाकणे, पोकों/बाबासाहेब पाटील, प्रमोद ठाकुर, भारत पाटील तसेच पोकों/मिलींद जाधव, गौरव पाटील तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन कडील पोहेकॉ/विजय नेरकर, पोकॉ योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अमर अढाळे, हर्षल महाजन, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, प्रदीप चवरे यांनी केली आहे.






