ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विचार जागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. आर. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” — हा टिळकांचा संदेश आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम जागवतो. तसेच “लोकविचारांचा जागर” करत टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे विचार, कार्य आणि प्रेरणादायी जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन करताना आकाश महालपूरे अण्णाभाऊ साठे यांचा “साहित्य हे केवळ करमणुकीसाठी नाही, ते समाजपरिवर्तनाचे हत्यार आहे.” हा विचार अधोरेखित केला. या महापुरुषांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांची पुस्तके वाचावी लागतील, त्यांचे जीवनकार्य आत्मसात करावे लागेल आणि त्याचे अनुकरण करून जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.
कार्यक्रमात विद्यार्थी–विद्यार्थिनींनी भाषणे, गीत, विचारप्रद सादरीकरण करून टिळक व अण्णाभाऊ यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी अश्विनी तडवी, लिपिक बच्छे, प्रयोगशाळा परिचर शेंडे तसेच शिपाई निखिल तडवी, आदी उपस्थित होते.