मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. या मालिकेतील हा पाचवा लेख.
मलबार हिल येथील राजभवनाचा क्रिकेटचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. या ठिकाणी पाच वर्षे राहिलेले मुंबई प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड जॉर्ज हॅरिस (१८९०-१८९५) इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार होते. त्यांनी आपल्या गव्हर्नर पदाच्या कार्यकाळात क्रिकेटला चालना दिली. ते मायदेशी परत गेल्यावर त्यांच्या नावाने सुरु झालेली आंतरशालेय हॅरिस शिल्ड स्पर्धा अजूनही खेळली जाते.
स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय राज्यपाल राजा महाराजा सिंह (1948-1952) क्रिकेटर नव्हते. परंतु, सन 1950 साली ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या तीन दिवसांच्या प्रथमश्रेणी सामन्यात ‘गव्हर्नर्स XI’ संघाकडून ते आग्रहाखातर खेळले व ‘कॉमनवेल्थ XI’ संघाविरुद्ध आपल्या संघाचे नेतृत्व केले. त्यांचे नाव आज देखील ‘प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात आपला पहिला सामना खेळणारे सर्वात ज्येष्ठ खेळाडू’ म्हणून नोंदले गेले आहे.
हा सामना खेळले राजा महाराजा सिंह यांचे त्यावेळी वय 72 वर्षे 195 दिवस इतके होते. सन 1981 साली वानखेडे स्टेडिअमवर भारत – इंग्लंड कसोटी सामना खेळल्या गेला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल असलेल्या एअर चीफ मार्शल (नि) ओ पी मेहरा व त्यांच्या पत्नी सत्या मेहरा यांनी राजभवनावर दोन्ही संघांकरिता चहापानाचे आयोजन केले होते.
सोबतच्या छायाचित्रांमध्ये इंग्लंड क्रिकेट संघाचे काही खेळाडू राज्यपालांच्या पत्नी सत्या मेहरा यांच्यासोबत दिसत आहेत.
- John Lever 2. Graham Dilley3. Chris Tavare 4. Smt. Satya Mehra, wife of Governor Air Chief Marshal (retd.) O P Mehra 5. Keith Fletcher, Captain 6. Mike Gatting 7. David Gower 8. Scorer Geoffrey Sualez.
छायाचित्रातील डावीकडून तिसरा खेळाडू क्रिस तवारे हा १९८२ साली ओव्हल मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या एका कसोटीत सामना अनिर्णित राखण्यासाठी इतका संथ गतीने खेळला होता की कंटाळलेला एक युवा प्रेक्षक तवारेला बसण्यासाठी मैदानावर चक्क एक स्टूल घेऊन आला होता.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन, मुंबई)