जळगाव – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच अमित शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावात ठाकरे गटाच्या वतीने निदर्शनेही करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे माध्यमांशी बोलताना गुलाबराव वाघ म्हणाले की, ‘परवा संसदेत या देशाचे गृहमंत्री म्हणतात की, त्या संसदेत डॉ. बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख त्याठिकाणी करतात. बाबासाहेब, बाबासाहेब, बाबासाहेब, आंबेडकर, आंबेडकर असा उल्लेख करतात आणि त्याठिकाणी म्हटलं की, इतक्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल.
देवा धर्मावर आमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही आणि ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार होता. तुम्ही खासदार म्हणून निवडून आले. गृहमंत्र्याची शपथ घेतली आणि संसदेत बोलण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला, हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्या देवासारख्या माणसाच्या तुम्ही एकेरी उल्लेख करता म्हणून आम्ही या गृहमंत्र्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी महाविकास आघाडीकडून याठिकाणी मागणी करतो,’ असे गुलाबराव वाघ म्हणाले.
काय म्हणाले होते अमित शहा –
भारताच्या संविधानाचा अमृतमहोत्सव सुरू असल्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांत सध्या भारतीय संविधानावर चर्चा सुरू होती. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येक राजकीय पक्षांकडून भाषणे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधींपर्यंत नेत्यांनी संसदेत भाषणे केली. दरम्यान, मंगळवारी राज्यसभेत गृहमंत्री अमित शाहांनी भाषणादरम्यान, राहुल गांधींवर कडाडून टीका केली. राजकीय मंचावर संविधानाची प्रत वापरण्यावरुन जोरदार हल्लाबोल केला. तसेच आजकाल आंबेडकर, आबेडकर असे म्हणण्याची फॅशन झाली आहे. विरोधकांनी इतक्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात जागा मिळाली असती, असे वक्तव्य अमित शाहांनी केले होते.
…म्हणाले वक्तव्याचा विपर्यास –
त्यांच्या या वक्तव्यानंतर अमित शहांवर जोरदार टीका झाली. त्यावर ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे मी केलेले वक्तव्य हे तोडून-मोडून दाखवण्यात आले. काँग्रेसने वस्तुस्थितीचा विपर्यास केला, असा आरोपही त्यांनी केला. संविधानाचा आणि बाबासाहेबांचा सन्मान करणाऱ्या पक्षात मी काम करतो, असे ते म्हणाले.