मुंबई, 30 जुलै : महायुती सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असताना राज्यातील महायुती सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य असून या भूमिकेतून आमचे काम सुरू आहे. दरम्यान, येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत विकसित भारत 2047 च्या दृष्टीने नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली आहे. सन 2047 पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई- सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सध्या शासनाने ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे असून त्याद्वारे थेट डीबीटीद्वारे लाभाचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच एसटी प्रवास सवलत देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात येईल. दरम्यान, या केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिमेंशिया, अल्जायमर या आजाराबाबत सहायता उपलब्ध करून देण्यात येईल.
आरोग्य सुविधांबाबत महत्वाच्या सूचना –
मुख्यमंत्री शिंदे यांनी जेष्ठांना सुविधा देण्याबाबत आदेश देताना सांगितले की, इन्फ्लुएन्जा, न्यूमोनिया लसीकरणासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्ट राबवावा. त्यानंतर राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून या लसी उपलब्ध करून देण्यात यावे. ज्येष्ठांच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा नेण्यासाठी लवकरच हॉस्पिटल ऑन व्हील्स संकल्पना राबविणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासात ज्येष्ठांना देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरू करण्यासाठी आणि व्हीलचेअरसह इतर आवश्यक साहित्यांवरील आणि उपचारांच्या बिलावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : दुःखद! धुळ्यात भरधाव ट्रकने कारला चिरडले, तरुण पत्रकाराचा अपघातात मृत्यू