बीड, 27 ऑगस्ट : “देवेंद्र फडणवीस तुमचा हिशोब चुकता करणार आहे. आमचे लेकरं जेलमध्ये घातले वेळ हातात आल्यावर हिशोब चुकता करीन म्हटले की करीन हा माझा शब्द आहे, असे थेट आव्हानच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. बीड जिल्ह्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
सगळ्यांचा हिशोब चुकता करणार –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मी त्यांना सरळ करणार आहे. वेळ आणि काळ सोबत असायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचा हिशोब चुकता करणार आहे. ज्या ज्या लोकांनी आम्हाला अडचणी आणण्याचे काम केलय त्यांचा हिशोब येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहे. दरम्यान, रेकॉर्ड शोधणे बंद केला आहे, हे संपूर्ण कटकारस्थान देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केलाय. तसेच भांडण लावण्याचे काम सध्याला देवेंद्र फडणवीस करत आहेत, असेही जरांगे म्हणाले.
फॉर्म भरा अन् पैसेही घ्या –
मनोज जरांगे लाडकी बहिण योजनेवर बोलताना म्हणाले की, सरकारने सध्या लाडकी बहीण योजना आणली आहे. ही योजना चांगली असून योजनेचे फॉर्म भरा अन् पैसेही घ्या.. पैसे आपलेच आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी काय त्यांची नागपूरची प्लॉटिंग किंवा जमिनी विकून आपल्याला पैसे दिले नाहीत, असा टोला मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावलाय.
बहिणीच्या लेकरांचं काय? –
दरम्यान, राज्याच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मात्र, बहिणीच्या लेकरांचं काय? लाडक्या भाषाच्या आरक्षणाचे काय हे देखील सरकार सांगावं? तसेच लाडकी बहीण योजना आणली मात्र लाडक्या बहिणीच्या मेव्हण्याच्या शेतीच्या भावाचं काय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा : Video : दिलीप वाघ यांच्या ‘त्या’ आव्हानाला आमदार किशोर पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर, पाहा व्हिडिओ