मुंबई, 26 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली. दरम्यान, अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदी उठताच सागर बंगल्यावर जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.
मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल –
मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा देत अंतरवाली येथून पुढे गेल्यानंतर काल ते अंतरवालीजवळील भंबेरी येथील गावात मुक्कामाला होते. दरम्यान, आज त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत मुंबईला निघालेल्या सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचे आवाहन केले आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेत ते अंतरवालीत दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे काय म्हणाले? –
मनोज जरांगे म्हणाले की, संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. आम्हाला कायद्याचे पालन करायचे आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिले पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर टीका –
देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव न घेता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. “तु चुक केली, सागर बंगल्यावर स्वागत करू आणि दरवाज लावून घेतले आणि हे पोलीस बांधव तुझे नाहीत. संचारबंदी उठवा मग मुंबईला येतो का नाही,” असे आव्हान जरांगे यांनी दिले.
हेही वाचा : Budget Session 2024 : आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन