जालना, 3 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. अशातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यासोबतच्या भेटीबाबतचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटण्यासाठी आले होते, असे ते म्हणाले आहेत.मनोज जरांगे काय म्हणाले? –
मनोज जरांगे यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जरांगे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे मला भेटायला येणार होते. तसे निरोप त्यांच्याकडून मला 7 ते 8 वेळा आले होते. मात्र, मला भेटायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे काही वेळा ते अर्ध्या वाटेतून माघारीही गेले होते. त्यानंतर एक दिवस ते रात्री दोन वाजता अंतरवालीला आले. त्यावेळी मी झोपलो होतो. दरम्यान, मला मराठ्यांनी मोठे केले आहे, मला सांभाळा असे मुंडे म्हणाल्याचेही जरांगे सांगितले.
धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराड हा देखील होता. यावेळी वाल्मिक कराडची ओळख धनंजय मुंडे यांनी करून दिली. दरम्यान, कराडला पाहताच शेतकऱ्यांचे हार्वेस्टिंगचे पैसे खाणारा हाच का?, असेही विचारले होते, असे जरांगे यांनी सांगितले. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तपास यंत्रणा सोडणार नसून आरोपींची ही टोळी धनंजय मुंडे असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी वाढला दबाव –
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणात खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याचे नाव घेतले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. यावरूनच धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वस्तरातून दबाव वाढल्याने येत्या काळात सरकारडून मुंडेंचा राजीनामा घेतला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : “…अशा पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे!”; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलने केले शिवराज राक्षेचे समर्थन