नवी मुंबई, 28 जानेवारी : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सीबीएसई वगैरे यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी ही भाषा अनिवार्य करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर जोरदार फटकेबाजी केली.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
मी अनेक वर्षांपासून मराठी या विषयावर मी तुरुंगात गेले. अनेक विषय अंगावर घेतले. मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारच त्याप्रकारचे झालेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसजशी मला कळत गेली, तसतसा मी त्याच्या प्रेमात पडायला लागलो. मला जून महिन्यात अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिकेतर्फे आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याच्या अध्यक्षांनी मला आता सांगितलं की, अमेरिकेत महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत 100 शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये शाळा बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा सुरु होत आहेत, हे काय कमी आहे.
मला असे वाटतं की आधी आपण महाराष्ट्रात लक्ष देणे गरजेचे आहे. मला महाराष्ट्रातील शहरातील शहरांमध्ये मराठी सोडून हिंदी कानावर येते, तेव्हा त्रास होतो. भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे. जशी मराठी, गुजराथी, तमिळ, तेलुगू, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशामध्ये राष्ट्रभाषेचा निवाडा झाला नाही. राष्ट्रभाषा म्हणून कोतीही भाषा नेमली गेली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संवादासाठी इंग्रजी आणि हिंदी भाषा ठेवली. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे. हे सुरुवातीला बोलल्यावर अनेक लोक माझ्या अंगावर आले. मात्र, तेव्हा मी त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचा कागद समोर ठेवला.
आजही गुगलवर गेलात तर कळेल, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. भाषा उत्तम असली तरी आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, हिंदी चित्रपटातून आमच्यामध्ये हिंदी आली पण आपण हिंदी का वापरतो, इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरंतर मराठी भाषेमध्ये जो विरोध होतो, तो मला नाही वाटत इतर दुसऱ्या भाषेमध्ये होत असेल. इतकी समृद्ध भाषा, ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याने माझी तळपायाची आग मस्तकात जाते.
माझी दिपकजींना विनंती आहे की, महाराष्ट्रातील मराठी शाळा सोडून सर्व शाळांमध्ये सीबीएसई वगैरे यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी ही भाषा अनिवार्य करावी. मला कळत नाही, ज्याठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील, जिथं तुमची मुलं झाली, त्यामुलांना काय शिकवलं जातंय जर्मन, फ्रेंच. जणू काही ते देश बोलवातच येणार की या रे मुलांनो या. आमची लोकसंख्या वाढवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
जर्मन, फ्रेंच, चायनीज जी शिकायची आहे ते शिका, खूप भाषा शिका. पण जिथं राहात तिथं आधी तिथली मातृभाषा तर शिका. यामध्ये कमीपणा कसला आला. मराठीमध्ये बोलल्यावर कुणी बोलल्यावर तुम्ही म्हणता हे संकुचित आहेत. कशासाठी संकुचितपणा. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल त्यांचा राज्याबद्दल वाटतं, की जगामध्ये सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा पुतळा कुठे बांधावसा वाटतो तर गुजरातमध्ये बांधावसा वाटतो. हिऱ्यांचा वापर त्यांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतो, न्यावा त्यांनी. मला असं म्हणायचंय की, देशाच्या पंतप्रधानांना जर स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही आम्ही का लपवतोय, असा सवालही त्यांनी केला.
ही पंतप्रधानावर टीका नाही. जो मूळ आतला माणूस आहे, त्याला आपल्या भाषेवर, राज्यावर प्रेम आहे. तुम्ही का लपवत आहात. ज्या राज्यात मी राहतो, त्या राज्यामध्ये मराठी माणूस घर घ्यायला जातो, त्यावेळी तिकडचा जैन सोसायटीमधील माणूस सांगतो घर मिळणार नाही, काय करायचं आम्ही. तमिळनाडूमध्ये करुन दाखवा, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये, आसाम, आंध्रप्रदेश, केरळमध्ये असे करुन दाखवा. स्थानिक माणसाला पैसे असून घर दिले जात नाही, हे महाराष्ट्रात का होतं. कारण आमचं बोटचेपे धोरण. आम्हीच आधी मागे हटतो. आधी आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ, असे ते म्हणाले.