मुंबई, 14 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पीकांकडे पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस ऑगस्टच्या अखेरीस बरसण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पावासाची नोंद झाली आहे. (Rain Update)
असा आहे पावसाचा अंदाज –
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावासाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात आणि शेजारील तसेच शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण याबाबत स्पष्टता नसल्याचे हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितले.
कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 21 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात मान्सून सक्रिय होईल. सप्टेंबर महिन्यात विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टला पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.