जळगाव, 11 ऑगस्ट : महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी, केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या हस्ते जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानावर ‘खेलो इंडिया अस्मिता फुटबॉल लीग 2025-26’ चे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विविध समाजघटकांतील युवा महिला खेळाडूंची प्रतिभा शोधून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.
उद्घाटन सोहळ्यात 13 वर्षांखालील नवोदित फुटबॉलपटूंनी सहभाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना श्रीमती रक्षा खडसे म्हणाल्या, “हे असे व्यासपीठ आहे, जिथे आवड ही कामगिरीमध्ये बदलते. ही लीग फक्त खेळाबद्दल नाही, तर ती अडथळे दूर करण्याबद्दल आहे. हा उपक्रम आदिवासी व अल्पसंख्याक समाजातील महिला खेळाडूंसह सर्वांना प्रकाशझोतात आणतो आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वज्ञानाचे स्पष्ट प्रतीक आहे.”
‘खेलो इंडिया अस्मिता’ लीग हा ‘खेलो भारत नीती’चा एक महत्त्वाचा भाग असून राष्ट्रनिर्माण आणि महिला सक्षमीकरणासाठी खेळांना प्रोत्साहन देण्यावर भर देतो. या माध्यमातून ऐतिहासिक असमानता दूर करून नवीन संधी उपलब्ध होत आहेत, तसेच महिलांना क्रीडा क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्याची संधी मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार तळागाळातील प्रतिभेला संधी देऊन भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनविण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सचिव केतकीताई पाटील, फारुख शेख तसेच महाविद्यालय प्रशासनातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.
हेही वाचा : फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण