पाचोरा, 25 मे : पाचोऱ्यात आज 25 मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा रॅलीत भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या चंदू चव्हाण यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील काही जवानांनी उपस्थित राहत न्याय मिळण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बडतर्फ जवानांच्या मागणीची दखल घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापर्यंत पाठपुरावा करून संवैधानिक मार्गाने न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिले.
तिरंगा रॅलीत नेमकं काय घडलं? –
पाकिस्तानमध्ये गेलेले जवान चंदू चव्हाण यांना भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. या निर्णयानंतर ते गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार विरोधात लढा देत असून आपल्याला सेवेमधून का बडतर्फ करण्यात आले, असा प्रश्न विचारत त्यांना आतापर्यंत अनेक ठिकाणी आंदोलन केली आहे. असे असताना त्यांच्यासह काही बडतर्फ जवानांनी आज पाचोऱ्यात निघालेल्या तिरंगा रॅलीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
चंदू चव्हाण काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील यांना चंदु चव्हाण म्हणाले की, ज्यावेळी मी पाकिस्तानात गेलो होतो..त्यावेळी मला परत आणण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांसाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. मात्र, मला न्याय मिळावा यासाठी आतापर्यंत अनेक खासदार तसेच मंत्र्यांना मी पत्र दिलेले आहेत. रक्षा मंत्रालयाकडून देखील मला पत्र प्राप्त झाले असून माझी चौकशी सुरू असल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता मला तुमच्याकडून अपेक्षा असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारपर्यंत आमची मागणी पोहचून आर्टिकल 21 प्रमाणे आमची दखल घेऊन माझ्यासारख्या असंख्य सैनिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी चंदू चव्हाण यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे केली. याबाबतचे लेखी निवदेन चंदू चव्हाण यांच्यासह काही सैनिकांनी आमदारांना दिले.
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली दखल –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ निवदेन स्विकारत पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, पाचोरा तालुक्यात सर्वपक्षीय आणि देशप्रेमींच्या उपस्थितीत तिरंगा रॅली निघाली. या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने जिल्हाभरातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांनी त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचे निवेदन मला दिलेले आहे. यानिमित्ताने मी आपणांस आश्वासित करतो की, बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे संवैधानिक अनेक मार्ग आहेत. देशात असा एकही प्रश्न नाही की तो सुटत नाही. यामुळे तुम्ही कुठलीही चूक केलेली नाहीये. म्हणून तुम्ही सर्वांनी तुमच्यावर जो अन्याय झाला असेल तो संवैधानिक मार्गाने आमच्यापर्यंत पोहचवला पाहिजे.
View this post on Instagram
शासनापर्यंत प्रश्न मांडणार –
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले, मी आपल्याला खात्री देतो की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच संरक्षणमंत्री राजनाथसिंग तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत हा प्रश्न मांडू आणि संवैधानिक मार्गाने हा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करू. दरम्यान, आपण सर्वांनी काळजी करण्याचे कारण नाहीये. मी देखील पोलीस सैनिक होतो. यामुळे आपल्याला खात्री देतो की, तुमच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपस्थित बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांना दिली.
दरम्यान, मी बडतर्फ सैनिकांचे पत्र स्विकारले असून या निवेदन पत्राला माझे स्वतःचे पत्र तयार करून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहचवू असेही आमदार पाटील म्हणाले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तात्काळ निवेदन स्विकारल्यानंतर बडतर्फ सैनिकांनी भारत माता की जय, अशा घोषणा देत आभार व्यक्त केले.
पाचोऱ्यात तिरंगा रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद –
पाचोरा शहरात शिवसेनेच्यावतीने सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांनी तसेच देशप्रेमींनी या तिरंगा रॅलीत सहभाग नोंदवत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.