ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 ऑक्टोबर : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मी जो निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या समर्थनार्थ माझ्या मतदारसंघातील जनतेने मला साथ दिली. आणि माझ्या निर्णयाच्या समर्थनासाठी मोर्चा काढला. त्यांनी जे समर्थन दिले ते सार्थक ठरवत हजारो करोड रूपयांचा निधी आणला आणि आज लोकांना वाटतंय की, किशोर आप्पांनी जो निर्णय घेतला तो 100 टक्के योग्य होता, असे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासोबत नुकताच संवाद साधण्यात आला. शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यांसदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाष्य केले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ हा भावनेवर चालणारा नसून कर्तृत्वाला सन्मान देणारा तसेच विकासाला साथ देणारा हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून आम्ही केलल्या उठावावेळी राज्यात अनेकांच्या विरोधात मोर्चे निघाले असतील. मात्र, मी घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मतदारसंघातील जनतेने मोर्चा काढला. याचा मला सार्थ अभिमान असून त्यांनी जे समर्थन दिले त्याला साजेसे असे काम मी गेल्या अडीच वर्षांत केले.
दरम्यान, आज लोकांना वाटतंय की, किशोर आप्पांनी जो निर्णय घेतला तो 100 टक्के योग्य होता. म्हणून आम्ही एवढा निधी आणू शकलो, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघाला निधी न मिळाल्याचा आरोपही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत