ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 23 ऑगस्ट : तुम्ही निष्ठा सोडली आहे म्हणून तुम्ही तात्यांचा फोटू वापरू शकत नाही, हे मी वारंवार सांगत आलीय. दरम्यान, यापुढे तात्यांचा फोटू वापरायचा नाही, असे आव्हान आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी दिले होते. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तात्यासाहेबांचा फोटो उद्यापासून माझ्या बॅनरवर नसेल; पण तात्यासाहेब हे माझ्या ह्रदयात कायमस्वरूपी आहेत. होते आणि राहतील. त्यामुळे त्यांना माझ्या ह्रदयातून कुणी काढू शकत नाही, असे ते यावेळी म्हणाले.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
पाचोऱ्यात संजय राऊत यांच्या सभेत खासदार वैशाली सुर्यवंशी यांनी काल त्यांच्या भाषणात तात्यांचा (आर.ओ.पाटील) फोटो यापुढे वापरायचा नाही असे सांगितले. यावरून आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील त्यांच्या निवासस्थानी शिवालय येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेतला. ते म्हणाले की, तात्यासाहेब माझे राजकीय बाप असून त्यांनी मला खरा राजकीय जन्म दिलाय. यामुळे त्यांचे आदराचे स्थान माझ्या व शिवसैनिकांच्या ह्रदयात आहे. मी व माझा परिवार तसेच शिवसैनिक हे तात्यासाहेबांचा कायमस्वरूपी आदर करतील. पण वैशाली सुर्यवंशी यांच्याकडून होणाऱ्या वारंवार अनादरांनतर निर्णय घेण्याचा ठरवलंय.
आमदार किशोर पाटील यांचा मोठा निर्णय –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लोकमतची खुर्ची त्यांच्या ऑफिसला पाठवली होती. त्याचपद्धतीने मी अतिशय आदरपुर्वक मी व माझे सर्व पदाधिकारी तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हा निर्णय घेत आहोत. तात्यासाहेबांचा आदर कायम राखत त्यांचीविषयीची श्रद्धा मनात कायम ठेवत उद्यापासून माझ्या कुठल्याही बॅनरवर कै. तात्यासाहेबांना घेणार नाही, अशापद्धतीचा मी निर्णय घेतलाय. आज आम्ही मी व सर्व पदाधिकारी तात्यासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून आमचे कार्यकर्ते ही प्रतिमा त्यांच्याकडे घेऊन जातील आणि त्यांना सुपूर्द करतील.
तात्यासाहेब हे माझ्या कायमस्वरूपी ह्रदयात –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, तात्यासाहेबांचा फोटो उद्यापासून माझ्या बॅनरवर नसेल; पण तात्यासाहेब हे माझ्या ह्रदयात कायमस्वरूपी आहेत. होते आणि राहतील. त्यामुळे त्यांना ह्रदयातून कुणी काढू शकत नाही. आज सगळ्या मतदारसंघाला माहितीये. मी जरी तात्यांना राजकीय बाप मानत असलो तरी तात्यांचा पावलांवर पावल ठेऊन या मतदारसंघात स्वतः प्रती एक प्रतिमा तयार केलीय. त्यामुळे त्यांचा जो काही भ्रम आहे तो भ्रमनिरास करण्याचे काम मतदारसंघातील जनता करेल.
वैशाली सुर्यवंशी यांच्यावर टीका –
वैशाली सुर्यवंशी प्रत्येक भाषण हे वाचून करत असतात. आणि त्यातून त्यांची भूमिका मांडतात. परंतु, ते भाषण लिहून देणाऱ्याच्या मनाने त्या चालत आहेत. आणि म्हणून ते सांगतात की तात्यांचा फोटो लावयचा नाही. पण तात्या तुमचे बाप नक्की असतील तर माझा राजकीय बाप हा आर ओ तात्या पाटील आहे, असे म्हणत आमदार किशोर पाटील यांनी वैशाली सुर्यवंशी यांच्यावर टीका केली. दरम्यान, मी जर ठरवलं असतं तर शिवसेना कार्यालय सोडलं नसतं, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : “…म्हणून मी राजकारणात सक्रिय झाले” संजय राऊतांच्या उपस्थितीत वैशाली सुर्यवंशी यांनी सांगूनच टाकलं