ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील तरूणांसाठी येत्या एका महिन्याच्या आत प्रत्यक्षात क्रीडा संकुलाचे काम सुरू करणार असल्याची माहिती पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी दिली. पाचोऱ्यात आयोजित केलेल्या लोकप्रतिनिधी-पत्रकार संवाद बैठकीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
लोकप्रतिनिधी-पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, पाचोऱ्यात क्रीडा संकुल निर्मितीचा विषय मागील दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या कार्यकाळात त्यांनी पाचोऱ्यानजीक असलेल्या सारोळ्याजवळ क्रीडा संकुलासाठी जागा निश्चित केली होती. परंतु, मी आमदार झाल्यानंतर ती जागा नाकारली. कारण, एखादे क्रीडा संकुल उभारायचे असेल आणि त्यामाध्यमातून तरूणांच्या कला गुणांना वाव मिळत असेल तसेच वरच्या पातळीवर जाण्याची संधी मिळत असेल. तर गावाच्या जवळपास असलेल्या या क्रीडा संकुलापर्यंत तरूण पोहचले पाहिजे. यासाठी मी पाठपुरावा करून आधी निश्चित केलेली जागा नाकारली.
येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात –
आमदार किशोर पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पाचोरा शहराजवळील काकनबर्डी जवळ क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. आधी या क्रीडा संकुलासाठी 1 कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, आता या क्रीडा संकुलासाठी 1 कोटीच्या निधीवरून थेट 5 पाच कोटींचा निधी मंजूर करून आणला. क्रीडा संकुल तयार करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असून येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
दरम्यान, पर्यटनाच्या माध्यमातून काकन बर्डीला 5 कोटी रूपये, क्रीडा संकुलाला 5 कोटी रूपये आणि त्याच परिसरात अद्यावत गार्डन तयार करण्यासाठी 7 कोटी रूपये, असे एकूण 17 कोटी रूपयांचा निधी त्याठिकाणी मंजूर झाल्याची माहिती देखील आमदार किशोर पाटील यांनी दिली.
पाचोऱ्यातील उपजिल्हा रूग्णालयाबाबत काय म्हणाले? –
पाचोऱ्यातील उपजिल्हा रूग्णालयाबाबत माहिती देताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, पाचोरा तालुक्यात 17 करोड रूपयांचे उपजिल्हा रूग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. पाचोरा शहरातील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यात येत असून येणाऱ्या चार-सहा महिन्यांच्या आत विविध विभागांचा समावेश असलेले सुसज्ज असे हे उपजिल्हा रूग्णालय असणार आहे. भविष्यात पाचोरा तालुक्यातील एकाही रूग्णाला जळगाव किंवा धुळ्याला जाण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था त्या रूग्णालयात तयार करण्यात येणार आहे.
भडगावातील उपजिल्हा रूग्णालयाच्या कामाला लवकरच सुरूवात –
आमदार किशोर पाटील यांनी भडगाव तालुक्याबाबत बोलताना सांगितले की, भडगाव तालुक्यासाठी देखील उपजिल्हा रूग्णालया मंजूर झाले असून त्यासाठीचा जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच तो प्रस्ताव मंजूर होऊन उपजिल्हा रूग्णालयाच्या कामाला सुरूवात होईल.
भडगावातील क्रीडा संकुलाबाबत काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सतीश पाटील ज्या काळात आमदार होते, त्याकाळात भडगावात क्रीडा संकुल झाले. यानंतर गुलाबराव देवकर यांच्यासह तत्कालीन सत्ताधारी यांनी भडगाव तसेच जळगाव नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडा संकुलाला कुठलाही निधी देऊ शकले नाही. मात्र, आता भडगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाचे उर्वरित काम पुर्ण करण्यासाठी 1 करोड रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून टेंडर प्रक्रिया पार पाडून महिन्याभराच्या आत प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल. यामुळे भडगाव तालुक्यातील एकाही तरूणाला बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी व्यवस्था क्रीडा संकुलात तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
लोकप्रतिनिधी-पत्रकार संवाद बैठकीचे आयोजन –
पाचोरा तालुक्यातील बांबरूड (महादेवाचे) येथे लोकप्रतिनिधी-पत्रकार संवाद या बैठकीचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत विविध समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यात करण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत देखील माहिती दिली. याप्रसंगी शिवसेनेतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह पाचोरा-भडगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
हेही वाचा : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत