ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर येत्या 48 तासांच्या आत महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जागा वाटप जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीकडून अधिकृतरित्या जागावाटप जाहीर झालेले नसताना तसेच कोणत्याही उमेदवाराला पक्षाकडून तिकिट जाहीर केलेले नसताना पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी फॉर्म भरण्याची तारीख ठरवलीय. येत्या 24 ऑक्टोबर रोजी आमदार किशोर पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
पाचोऱ्यातील शिवालय येथे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिली. जी संधी मला दिली त्या संधीचे सोने करण्याचे प्रयत्न मी सातत्याने करतोय. जे प्रश्न माझ्यासमोर आले ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मजूर, व्यापारी, शेतकरी, अशा प्रत्येक घटकांतील लोकांना न्याय देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न मागच्या 10 वर्षांत केलाय. ती टर्म पुर्ण झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केलीय. आणि 20 नोव्हेंबर विधानसभेचे मतदान पार पडणार आहे.
24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार –
ज्यापद्धतीने जनतेचे आशीर्वाद घेऊन मी उमेदवारी अर्ज दाखल करतो. त्याचपद्धतीने 24 ऑक्टोबर गुरूवार रोजी सकाळी 11 वाजता दसरा मैदान सिंधी कॉलनी येथून मी उमेदवारी अर्ज दाखल करायला निघणार आहे. यामुळे पाचोरा-भडगाव तालुक्यातील माय-बाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याचे गृहीत धरून 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
निर्धार मेळाव्याचे रेकॉर्ड ब्रेक करावे –
मी ज्यापद्धतीने पाच वर्षांची टर्म पुर्ण झाल्यानंतर मतदारसंघाला हिशेब देतो आणि पुढचा निर्धार करतो. कदाचित असा काही इतिहास असेल की महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचा निर्धार मेळाव्याला मतदारसंघातील जनतेने रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती दिली. दरम्यान, माझी त्याचपद्धतीची विनंती की, 24 तारखेला देखील समर्थकांनी हजेरी लावून निर्धार मेळाव्याचे रेकॉर्ड ब्रेक करावे, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.