चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 5 मार्च : जगातल्या मोठमोठ्या देशांना जे जमलं नाही, ते मोदीजींनी करुन दाखवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणाचंच यान उतरू शकलं नव्हतं. मोदीजींनी आपलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं. जगातील पहिला देश हा आपला भारत देश झाला. त्यानंतर आदित्य एल1च्या माध्यमातून सूर्याला गवसणी घालण्याचं काम भारताने मोदीजींच्या नेतृत्त्वात केले. हे सर्व करताना, मोदीजींनी एक जागतिक नेतृत्त्व उभं केलं, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावात केलं.
जळगाव शहरातील सागर पार्कवर युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या युवा संवादाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
जळगावात आयोजित युवा संवादात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आनंदाची गोष्टी की या खान्देशात या तरुणाईला साद घालण्यासाठी, खान्देशच्या तरुणाईला दिशा दाखवण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह आपल्यामध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्री मोदी जे विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे, त्याचे शुभारंभ आणि उत्तर महाराष्ट्रातून करतोय. 10 वर्षांत आपण मोदीजींचे सरकार पाहिले. त्यांनी परिवर्तन करुन दाखवलं. गरिबी हटावचा नारा सर्वांनी दिला. पण मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि 25 कोटी लोकांना गरीबीतून वर आणलं.
ते पुढे म्हणाले की, आज आपण पाहतोय, विकसित भारताकडे आपली वाटचाल होत आहे. मोदीजींनी भारतीय अर्थव्यवस्थेला जगात पाचव्या क्रमांकावर आणलं. गरीबांचे कल्याण करुनही अर्थव्यवस्थेचा विकास होऊ शकतो, हे मोदीजींनी दाखवून दिले.
आज आपण पाहू शकतो, ज्याप्रकारे काळ्या पैशावर मोदीजींनी प्रहार केला, ज्यांनी काळा पैसा जमा करुन ठेवला होता, तो सगळा पैसा बाहेर काढून मोदीजींनी बाहेर काढून गरिबांच्या कल्याणासाठी वापरला. युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्थव्यवस्था पंख तयार करते आणि मोदीजींनी ते तयार करुन दाखवलं. पुढच्या चार वर्षात ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
रोजगाराच्या संधी जितक्या 10 वर्षात उपलब्ध झाल्या, माझा दावा आहे, मागील 25 वर्षात जितक्या झाल्या, त्यापैक्षा जास्त मोदीजींनी मागील 10 वर्षात उपलब्ध केल्या आणि आणखी जास्त रोजगाराच्या संधी पुढील 5 वर्षात तयार होणार आहेत. विदेशातील लोक आज वंदे भारतचे कौतुक करतात. परदेशातील ट्रेन आज सामान्य लोकांना मोदीजींनी भारतात उपलब्ध करुन दिली. रेल्वे स्टेशन आज विमानतळासारखे होत आहेत, असेही ते म्हणाले.
तुम्ही विचार करा, जगातल्या मोठमोठ्या देशांना जे जमलं नाही, ते मोदीजींनी करुन दाखवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणाचंच यान उतरू शकलं नव्हतं. मोदीजींनी आपलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून दाखवलं. जगातील पहिला देश हा आपला भारत देश झाला. त्यानंतर आदित्य एल1च्या माध्यमातून सूर्याला गवसणी घालण्याचं काम भारताने मोदीजींच्या नेतृत्त्वात केले. हे सर्व करताना, मोदीजींनी एक जागतिक नेतृत्त्व उभं केलं.
140 कोटी भारतीयांना जिवंत ठेवलं पण जगातील 100 देशांना भारताने लस दिली. तेथील राष्ट्राध्यक्ष म्हणतात आमचा देश मोदीजींमुळे जिवंत आहे. जी20 मध्ये नेत्यांनी सांगितलं, आमचे नेते मोदीजी आहे. मला विश्वास आहे, गेले 10 वर्ष बिघडलेली घडी चांगली केली आहे. आता विकासाची गाडी धावणार आहे. 10 वर्षे तयारी झाली आहे. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान होतील, तेव्हा भारताची प्रगती वेगाने होईल. पुढचे 5 वर्षे तुम्हाला मोदीजींना निवडून आणायचं आहे. हे मत भारतासाठी आहे. तिसऱ्यांदा मोदीजींना निवडून आणण्यासाठी आपण तयार राहावं, असं आवाहनही त्यांनी तरुणाईला केलं.
यावेळी मंचावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील सदस्य मंत्री गिरीश महाजन, विजयकुमार गावीत, खासदार डॉ. हिना गावीत, सुभाष भामरे, उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, संजय सावकारे, राजेश पाडवी, काशीनाथ पावरा, मंगेश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.