मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 28 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सीआरपीएफच्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवत दोन वर्षांनी बदला घेतला आणि एका हळदीच्या कार्यक्रमात मुलगी तृप्ती आणि जावई अविनाशवर गोळीबार केला. यामध्ये तृत्पीचा जागाीच मृत्यू झाला तर जावई अविनाश हा गंभीरित्या जखमी झाला. दरम्यान, त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती तृप्तीची सासू प्रियंका ईश्वर वाघ यांनी दिलीय.
तृप्तीच्या सासूने नेमकं काय म्हणाल्या? –
चोपडा गोळीबाराच्या घटनेनंतर पत्रकारांनी प्रियंका वाघ यांना सदर घटनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माझ्या मुलीच्या लग्नात आमचा सर्व परिवार लग्नात नाचत असताना तृप्तीचा वडिल मागून येऊन त्याने गोळीबार केला. पहिली गोळी माझ्या सूनेला मारली आणि ती खाली पडली. यामध्ये दोन गोळ्या माझ्या मुलाला आणि दोन गोळ्या माझ्या सूनेला मारल्या. त्याचे नाव किरण मंगळे असून तो माझ्या नात्यातीलच होता. दरम्यान, माझी सून ही चौथ्या महिन्याची गर्भवती होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला, अशी मागणी प्रियंका वाघ यांनी केलीय.
View this post on Instagram
पोलीस अधिकारी काय म्हणाले? –
चोपडा गोळीबार घटनेची माहिती देताना चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, चोपडा शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात अचानक एका व्यक्तीने गोळीबार केला. त्या गोळीबारात त्याची स्वतःची मुलगी आणि जावई यांना गोळी लागली. त्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून जावयाच्या कमरेत गोळी लागल्याने तो जखमी झालाय. गोळीबार करणाऱ्याचे नाव किरण अर्जुन मंगळे हा शिरपुरचा राहणार असून त्याची मुलगी तृप्तीने त्यांच्या नात्यात असलेल्या अविनाश वाघ याच्यासोबत प्रेमविवाह केला होता.
दरम्यान, गोळीबार करणाऱ्या किरण मंगळेला मुलीने केलेला प्रेमविवाह मान्य नव्हता तसेच कमी शिकलेल्या मुलासोबत मुलीने लग्न केले होते. याचाच राग मनात ठेवत किरण मंगळेने हळदीच्या कार्यक्रमात हा गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर करण्यात आले. यापैकी एक गोळी तृप्तीला लागली आणि दोन गोळ्या अविनाश वाघला लागल्या. यानंतर उपस्थितांनी गोळीबार करणाऱ्याला देखील मारहाण केली. याप्रकरणी जखमी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करत असल्याची माहिती अण्णासाहेब घोलप यांनी दिली.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश