मुंबई, 18 फेब्रुवारी : अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भातील निवेदन मंगळवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सादर केले, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
या शिष्टमंडळात राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रिफ आणि पार्थ पवार यांचा समावेश होता. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी राज्य सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविण्यात येईल, तसेच सीबीआय चौकशीसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
निवेदनाद्वारे महत्वाच्या मागण्या –
निवेदनात काही गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. उड्डाणाच्या अगोदर क्रू रचनेत करण्यात आलेले बदल आणि त्यामागील अधिकृत प्रक्रिया यांची तपासणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हवाई वाहतूक नियंत्रणाशी झालेल्या संवादात व धावपट्टी मंजुरीच्या क्रमात आढळलेल्या विसंगतींचाही सखोल तपास व्हावा, असे नमूद करण्यात आले आहे.
विमानातील सुरक्षा चेतावणी प्रणालीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, लँडिंगच्या टप्प्याजवळ असतानाही कोणतीही आपत्कालीन संदेशवहन नोंद आढळत नसल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे. याशिवाय क्रूची तंदुरुस्ती, विमानाची देखभाल, नियमांचे पालन आणि विमानातील तांत्रिक प्रणालींचे फॉरेन्सिक परीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या स्वतंत्र यंत्रणांकडून तपास सुरू असला तरी सीबीआयमार्फत अधिक व्यापक आणि निष्पक्ष चौकशी होऊ शकते, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. सर्व मुद्द्यांचा सर्वंकष तपास करून लवकरात लवकर निष्कर्ष जाहीर करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.






