मुक्ताईनगर, 3 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मंत्री तथा सध्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, मुक्ताईनगरात साजरा करण्यात आलेल्या त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांनी 2019 च्या निवडणुकीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला.
काय म्हणाले एकनाथ खडसे? –
महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुकीत भाजपा सोडून राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी करा, असे शरद पवार मला सांगत होते. मात्र, आपण शरद पवार यांचे त्यावेळी ऐकले नाही, ही आपली चूक झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्यामुळे आपली पाच वर्ष वाया गेल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली. खडसे त्यांच्या वाढदिवसानिमित्त बोलत होते.
पक्ष सोडून जाणार नव्हतो –
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, भाजपमध्ये असताना 2019 मध्ये मला पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे पाच वर्ष वाया गेली. त्यावेळी भाजपा सोडून राष्ट्रवादी पक्षात येण्याच्या बाबत शरद पवार मला सांगत होते. मात्र इतकी वर्ष भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यात घालवली होती, त्यामुळे पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो.
मला सुद्धा ऑफर –
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते भाजप बरोबर युती करून गेले. मला सुद्धा दररोज फोन येत आहेत. इडी, सीबीआय सारख्या गोष्टी माझ्या पाठीमागे आहेत. आमच्याबरोबर या आणि हे संपवून टाका असे मला सुद्धा म्हणत आहेत, असे एकनाथ खडसे यांनी सभेत बोलताना सांगितले. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.
खडसेंची अजित पवारांवर टीका –
अजित पवार हे भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले, भाजपच्या वॉशिंगमध्ये अजित पवार हे सुध्दा स्वच्छ झाले, त्यामुळेच राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यात सादर केलेल्या नवीन चार्जशीट मध्ये अजित पवार यांचे नाव वगळण्यात आल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली.