जळगाव, 15 जून : राज्यात गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. यानंतर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्हीकडचे नेते एकमेकांवर टोकाची टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र रेल्वेतून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एकत्रित प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच दोघांनी या प्रवासात विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तर शरद पवार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एकत्रित प्रवासाने राजकीय वर्तुळाच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार जळगाव दौऱ्यावर –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 16 जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाचा एक दिवसीय शिबिरास मार्गदर्शनही करणार आहेत. दरम्यान, जळगाव दौऱ्यावर येत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेतून सोबत प्रवास करत असताना समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये जिल्ह्यातील विविध विकास कामांचा संदर्भात चर्चा झाल्याचे समजत आहे.
दरम्यान, दोघांच्या सोबत प्रवासामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण दोघांमध्ये नेमकी राजकीय चर्चा काय झाली, हे अद्यापही समोर आलेले नाही.