मुंबई, 14 जानेवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली असून त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला. यावेळी एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना त्यांनी तपास यंत्रणांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे आदेश –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन केला. यावेळी तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका तसेच एकही आरोपी सुटता कामा नये, अशा स्पष्ठ शब्दात सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासयंत्रणांना दिले आहेत.
नवीन एसआयटी स्थापन –
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी आधी नेमण्यात आलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. आधी नेमण्यात आलेल्या एसआयटीवर देशमुख कुटुंबियांचा आरोप होता. यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची नवीन एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
नवीन एसआयटीमध्ये यांचा आहे समावेश –
- किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
- अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
- सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
- अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
- शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
- दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
धनंजय देशमुख आज एसआयटी प्रमुखांची भेट घेणार –
सरपंच संतोष देशमुख यांचे यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास दोन तासांपासून अधिक काळ धनंजय यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, धनंजय देशमुख आज एसआयचीचे प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत. या चर्चेनंतर ते सामुहिक आत्महदहन आंदोलनाबाबत पुढील निर्णय जाहीर करणार आहेत.
हेही वाचा : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास