जळगाव, (23 जुलै) : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आयुष प्रसाद यांची नुकतीच जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष प्रसाद हे उद्या २४ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. तत्पूर्वी, आयुष प्रसाद यांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून पुणे जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली.
मुख्य कार्यकारी पदाची कारकिर्द –
आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी हाती घेत मागील साडेतीन वर्षात अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवण्यात त्यांचे महत्वाचे योगदाने होते. तसेच पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे मुलींसाठी निवासी शाळा उभारण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत असताना शाळांची गुणवत्ता वाढ, कुपोषणमुक्तीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
आयुष प्रसाद यांचा परिचय –
अतिशय कुशाग्र बुद्धीमत्ता आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाची ओळख असलेले आयुष प्रसाद हे २०१५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अधिकारी आहेत. आयुष प्रसाद यांनी युपीएससीच्या परिक्षेत भारत भरातून २४ वी रँक प्राप्त करत आयएएस होण्याचा मान मिळवला. आपल्या सेवेसाठी त्यांनी महाराष्ट्र केडरची निवड केली. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुरूवातीला अकोला यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. यानंतर आता ते जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होत आहेत. जिल्हाधिकारी पदाची त्यांची ही पहिलीच पोस्टींग आहे.
चार पिढ्या प्रशासकीय सेवेत – आयुष प्रसाद यांच्या जोडीला त्यांचे कुटुंब प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांचे पणजोबा हे ब्रिटिश काळातील ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’मधील सनदी अधिकारी होते. तर आयुष प्रसाद यांचे आजोबा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी होते. त्यांचे वडिल भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असून ते सध्या कर्नाटकात गुप्तचर खात्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आहेत व त्यांच्या मातोश्री आयएएस अधिकारी असून सध्या त्या केंद्रीय जल खात्यामध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत.