जळगाव, 26 जुलै : देशातील पर्यटन, समृद्ध वारसा व संस्कृती यांचे माहितीगार म्हणून जागतिक स्तरावर देशातील पर्यटनाचा प्रचार-प्रसार करतील, असे भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासाठी युवा पर्यटन मंडळांची स्थापना करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी नाशिक विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी युवा पर्यटन क्लब स्थापन करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे नाशिक विभागीय उपसंचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ‘युवा पर्यटन मंडळे’ स्थापना करण्यात येत आहेत. स्वातत्र्यांचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यालयांमध्ये सातवीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी युवा पर्यटन मंडळाची स्थापना करावयाची आहे. युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन 2023-24 या वित्तीय वर्षांमध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी 10 हजार व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी 25 हजार असे अनुदान ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना देण्यात येईल.
युवा पर्यटन मंडळामध्ये 25 विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील शिक्षक मंडळाचे समन्वयक म्हणून काम पाहतील. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीसाठी सर्व सहभागी विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक, शिक्षक व विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक, मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. युवा पर्यटन क्लब स्थापनेनंतर पर्यटन स्थळांना भेटी देण्याबाबत छायाचित्रांसह अहवाल मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती उपसंचालक कार्यालय पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001 दूरध्वनी क्रमांक (0253) 2995464/2970049 यावर संपर्क साधावा किंवा www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन ही पर्यटन उपसंचालक यांनी केले आहे.