अमरावती, 17 फेब्रुवारी : छायाचित्रे जन सामान्यांना विविध विषयांची माहिती व विचार पोहचविण्याचे महत्वपूर्ण साधन असून ती डोळ्यांना रिलीफ देणारी देखील आहेत. त्यामुळे पत्रकारितेचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी कॅमेरा किंवा ड्रोन द्वारा छायाचित्रणाचे तंत्र शिकण्याचेच नव्हे तर आत्मसात करावे, असे आवाहन भारतीय जन संचार संस्थानचे शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. डॉ. गोविंद सिंग यांनी केले.
भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात काल गुरुवारी दुपारी तीन वाजता ‘ड्रोन आणि फोटो पत्रकारितेतील नवीन प्रवाह’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यशाळेत नागपूर येथील छायाचित्रकार महेश टिकले यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे क्षेत्रीय संचालक प्रा.(डॉ.) वीरेंद्र भारती होते. यावेळी विचारमंचावर ड्रोन तज्ज्ञ रवी मनुस्मारे आणि निखिल वट यांचे सह प्रा. अनिल जाधव, डॉ. विनोद निताळे, डॉ.आशिष दुबे, प्रभात कुमार उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ. गोविंद सिंग म्हणाले, वाचकाला नुसती बातमी वाचायची नसते तर ती घटना स्वतः अनुभवायची असते. हे फक्त ड्रोन आणि कॅमेऱ्याद्वारे काढलेल्या फोटोंमुळेच शक्य आहे. बातमीतील ताजेपणा छायाचित्रांमुळे येतो. त्यासाठी आता ड्रोनचा वापर पत्रकारितेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्ताराने पत्रकारितेच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहे. या बदलांना विद्यार्थ्यांनी समजून त्या नुसार स्वतःला अपडेट करावे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला.
तर नागपूर येथील छायाचित्रकार महेश टिकले म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी भविष्यातील पत्रकारांनी नवीन अपडेटिंग तंत्र अवगत करणे गरजेचे आहे. ड्रोन मुळे छायाचित्र पत्रकारितेचे स्वरूप बदललेले आहे. हे नवे तंत्र पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करियर करण्यासाठी उपयुक्त आहे. कालानुरूप वाचक-प्रेक्षकांची आवड बदलली आहे.
आता वाचकाला कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती मिळवायची आहे. त्याला थेट बातम्यांशी जोडायचे आहे. वाचक-प्रेक्षकांच्या या इच्छेनुसार आता पत्रकारितेत बदल होत आहेत. आगामी काळात पत्रकारिता ही वाचक आणि प्रेक्षक यांच्यानुसार असेल. पत्रकारांसमोर हे मोठे आव्हान आहे. ड्रोन आणि फोटो पत्रकारितेचे वाढते महत्त्व या आव्हानाचा परिणाम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. (डॉ.) वीरेंद्र कुमार भारती म्हणाले, ड्रोन आल्यानंतर पत्रकारितेत मोठा बदल झाला आहे. आता पत्रकार अधिक चांगल्या पद्धतीने घटनेचे वार्तांकन करू शकतात. ड्रोन तंत्रज्ञान हे एक प्रकारे पत्रकारितेसाठी वरदानच आहे. दरम्यान, या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यात आली. ड्रोन हाताळणीचे तंत्र, निर्मितीची प्रक्रिया, ड्रोन व फोटो पत्रकारितेच्या माध्यमातून बातमी लेखनाचे तंत्र आदींचे प्रशिक्षण प्रात्याक्षिकासह देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद निताळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. आशिष दुबे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा शर्मा, शिल्की शौर्य, स्मित तराल आणि रजत चंद यांनी केले. यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह संजय पाखोडे, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, अनंत नांदुरकर उपस्थित होते.