ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव मतदारसंघात पाच ते दहा वर्षांपुर्वी पाण्याबाबत अवघड परिस्थिती होती. शेतात पिण्यासाठी पाणी हे घरून आणावे लागत होते, अशी ही परिस्थिती पाण्याबाबतची या मतदारसंघात होती. असे असताना गेल्या दहा वर्षांपासून जलयुक्त शिवारापासून ते जलसंधारणापर्यंत सर्व कामे केली गेलीत, असे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. पाचोरा तालुक्यातील गळद नदीचे आमदार पाटील यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
गळद नदीवर एक-एक किमी अंतरावर 29 बंधारे बांधण्याचे काम याठिकाणी करण्यात आले. या प्रत्येक बंधाराचे बॅक वॉटर मागच्या बंधाऱ्याला जोडण्याचे काम हे दिघी पासून ते नाचणखेडा, लोहठार परिसरापर्यंत करण्यात आले आहे. जी शेती आधी कोरडवाहू होती ती शेती येणाऱ्या काळात केळी तसेच डाळिंबा बागाने फुललेल्या दिसतील, याचा मला सार्थ अभिमान असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना रस्त्यांच्या अडचणी आहेत. मोठ्या प्रमाणात यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. असे असताना नेरी येथे पाणी अडविल्यामुळे रस्ता बंद झाला आणि त्याठिकाणी जवळपास 12 कोटी रुपयांचा रस्ता बनविण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात आली. म्हणून ज्याठिकाणी पाण्यामुळे रस्त्याची समस्या निर्माण झाली ती समस्या रस्ता तयार करुन दूर करायची असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांच्यासह शिवेसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पाणी साठवण्यासाठी आमदारांच्या मदतीमुळे यश –
ज्याप्रमाणे भागिराथाने गंगा पृथ्वीवर आणण्याचे काम केले त्याप्रमाणे गळद नदीमध्ये पाणी साठवण्याचे काम आमदार किशोर आप्पांनी केले असल्याच्या भावना व्यक्त करत पावसाळ्यात झालेल्या पाण्याचे साठवण करण्यासाठी आमदारांच्या मदतीमुळे यश आल्याचे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान, विरोधक किशोर आप्पांवर टीका करु शकतात मात्र चांगल्या कामांचे ते कौतुक करु शकत नाही, असे उपस्थित असलेले नागरिक म्हणाले.
हेही वाचा : नरेंद्र मोदी उद्या खान्देशात; विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांची महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा