ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑगस्ट : पाचोरा तसेच भडगाव तालुक्यात नवीन वीज मीटर पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर बसविण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नवीन वीज मीटर पोस्टपेड किंवा प्रीपेड मीटर विरोधात शहरातील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
स्मार्ट मीटर बसविणाऱ्या ठेकेदाराच्या अनगोंदी कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. पाचोरा भडगाव तालुक्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू नये अन्यथा स्मार्ट मीटर बळजबरीने बसविण्याच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात शिवसेना स्टाईलने उत्तर दिले असा इशारा निवदेनाच्या माध्यमातून यावेळी पाचोरा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.
निवदेनात काय म्हटलंय? –
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाचोरा व भडगाव शहर व तालुक्यात महावितरण कंपनीच्या ठेकेदारांकडुन स्मार्ट मिटर लावण्याचा अनागोंदी कारभार सुरु असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सुप्रीम कोर्टाने ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मिटर लावण्यास मनाई केलेली असताना, ठेकेदारांकडुन गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जबरदस्तीने मीटर बदलेले जात आहेत. याबाबत महावितरणच्या ठेकेदारांना विचारणा केली असली तरी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, केवळ तांत्रिक बिघाड किंवा ग्राहकांच्या तक्रारी असल्यास स्मार्ट मिटर लावण्याची परवानगी आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जबरस्तीने स्मार्ट मीटर लावण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, ठेकेदार आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरसकट मीटर बदलत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे ठेकेदारांचा हा प्रकार महसुल वाढवण्याचा डाव आहे का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तरी हे सदरील स्मार्ट मीटर पाचोरा, भडगाव तालुका तसेच पाचोरा-भडगाव शहरीभागात कुठेही स्मार्ट मीटर लावु नये, तसे केल्यास आम्ही शिवसेना पाचोराच्यावतीने महावितरण कंपनीच्या ठेकेदारांच्या स्मार्ट मीटर बळजबरीने बसविण्याच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आता पुन्हा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती –
यावेळी उपजिल्हाप्रमुख शिवसेना किशोर बारवकर यांच्यासह शहर प्रमुख सुमित सावंत, बंडू सोनार, अन्वर शेख, गोपाल भोई, भारत राजेश भैरू, अमन किसन झनझोटे, पंकज गोसावी, शेरू शेख, करण कंडारी, रोहन पवार, तसूद शेख, दीपक मिस्तरी, अल्ताफ खान, संदीप पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.