पाचोरा, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील मानाच्या महाराष्ट्र केसरी या स्पर्धेसाठी 92 किलो वजनीगटातून पाचोरा तालुक्यातील हितेश पाटील या तरुणाची निवड करण्यात आली आहे. अमळनेर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून जळगाव जिल्ह्यातून 20 कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरीसाठी निवड करण्यात आली. त्यात पाचोरा तालुक्यातील हितेश पाटील याची 92 किलो वजनीगटातून निवड झाली आहे. महाराष्ट्र केसरी ही राज्यातील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. कुस्ती खेळाडू आणि कुस्ती प्रेमीसाठी हा एक प्रकारचा कुंभ मेळावाच असतो.
नेमकी कशी झाली निवड? –
कुस्तीपटू हितेश पाटील याने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याची निवड झाल्याबाबत सांगितले की, माझी काही महिन्यांपूर्वी पाचोरा तालुक्यातून निवड करण्यात आली होती आणि दोन दिवसांपूर्वी नुकतीच अमळनेर येथे जिल्हा निवड चाचणीमध्ये माझी जिल्ह्यातून प्रथम येऊन राज्यावर निवड झाली आहे, म्हणजेच आता मी महाराष्ट्र केसरीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत 92 किलो वजनीगटातून गादी विभागासाठी जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
महाराष्ट्र केसरीसाठी ‘या’ पद्धतीने होते निवड –
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सर्वात आधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर निवड चाचणी घेण्यात येते. यामध्ये तालुक्यातील सर्व गावातील विविध वजनगटातून कुस्तीपटूंची निवड करण्यात येते. यामध्ये एका वजनी गटातून एक असे प्रत्येकी एक कुस्तीपटुची निवड जिल्हास्तरावर केली जाते. यानंतर तालुकास्तरावर निवड झालेल्या कुस्तीपटूंची जिल्हा निवड चाचणी पार पडते. जिल्हास्तरावर निवड झालेले कुस्तीपटू आपापल्या जिल्ह्याचे नेतृत्व महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानावर करतात.
असे असतात वजनी गट –
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी विविध वजन गटात विभागणी केली जाते आणि हे वजन गट माती व गादी (मॅट) विभागात दोन ठिकाणी खेळले जातात. 57 , 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 125 किलोग्रॅम या वजनी गटांचा यामध्ये समावेश असतो.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 –
65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिवमध्ये संपन्न होणार आहे. 16 ते 20 नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. 5 दिवस या स्पर्धा चालणार असुन यात विजेत्यांना मानाची चांदीची गदा, स्कॉर्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी 2 कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. माती 20 व मॅट 20 असे वेगवेगळे 40 गट सहभागी होणार असुन 950 मल्ल भाग घेणार आहेत. स्कर्पिओ एन व 1 लाख, 20 बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत.