ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 08 नोव्हेंबर : प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांचे अध्यक्षतेखाली पाचोरा तालुका संघटनेच्यावतीने मैत्रेय कंपनी गुंतवणूक ठेवीदारांचा प्रलंबित विषय मार्गी लागण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना काल (07 नोव्हेंबर) निवेदन देण्यात आले.
काय संपूर्ण बातमी? –
मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने अधिक व्याजाचे आमिष दाखवून राज्यासह भारतभरातून करोडो ठेवीदार यांचेकडून 2500 करोडो रूपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा केली. आणि मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका (सीएमडी) वर्षा सत्पाळकर यांनी 2015 पासून ठेवीदार यांचे परतावे परत करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, 2016 मध्ये वर्षा सत्पाळकर यांचेवर नाशिक येथे एमपीआयडी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. काही अटी व शर्तींवर त्यांची जामीनावर सुटका देखील करण्यात आली होती. परंतु वर्षा सत्पाळकर यांनी कोणत्याही अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे अद्याप मैत्रेय कंपनीत कष्टाचे पैसे गुंतविणाऱ्या ठेवीदारांना त्यांचा हक्काचा परतावा न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत.
मानवाधिकार संघटनेचे निवेदन –
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी संघटनेतील पाचोरा तालुका पदाधिकाऱ्यांसह आमदार किशोर पाटील यांना निवदेन दिले. राज्याच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मैत्रेय कंपनी गुंतवणूक ठेवीदारांचा प्रलंबित विषय तारांकित स्वरूपात मांडावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच सद्यास्थितीत सरकारच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही होत नसल्याने व मुंबई सत्र न्यायालयात देखील मैत्रेय कंपनीचे वरील कामकाज संथ गतीने सुरू आहे. असे असताना या प्रकरणाला न्याय केव्हा मिळणार?असा प्रश्न देखील दुसाने यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
आमदारांचा सातत्याने पाठपुरावा –
आमदार किशोर पाटील यांनी मागील काही वर्षांपासून मैत्रेय ठेवीदारांना न्याय मिळण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. राज्याच्या अधिवेशनांमध्ये त्यांनी याप्रश्नी अनेकदा आवाज उठवला आहे. तसेच मंत्रालयात संबंधित मंत्री तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत देखील बैठका घेतल्या आहेत. दरम्यान, मानवाधिकार संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवदेनात आमदार किशोर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मैत्रेय ठेवीदारांना आशा लागली आहे.
यांची होती उपस्थिती –
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर पाटील, नीलकंठ बापू पाटील, सुनील पाटील, शिवसेनेतील इतर पदाधिकारी तसेच पाचोरा तालुका संघटनेचे पाचोरा तालुका अधीक्षक विनोद पाटील, पाचोरा तालुका उपाध्यक्ष प्रकाश विसपुते, पाचोरा तालुका सचिव इंद्रनील पाटील, पाचोरा तालुका जनसंपर्क प्रमुख ईसा तडवी, पाचोरा तालुका महिला अध्यक्षा मंदाकिनीताई पाटील, पाचोरा तालुका महिला उपाध्यक्षा किरणताई पाटील, पाचोरा तालुका महिला संघटक सुषमाताई पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.