धुळे, 19 जुलै : धुळे जिल्ह्यात बेकायदेशीर व अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी पोलिसांनी सापळा रचत मोठी कारवाई केली असून जागा मालक आणि जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह 30 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महिंदळे शिवारातील धुळे-साक्री रोडवरील हॉटेल महिंद्राच्या पाठीमागे 200 मीटर अंतरावर हिंमत शेवाळे या व्यक्तीचे पत्र्यांचे शेड आहे. या शेडमध्ये बेकायदेशीर आणि अवैधरित्या जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि जागा मालक आणि जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह 30 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले.
हिम्मत शेवाळे असे जागा मालकाचे नाव आहे तर अमित ब्रिजलाल, दिलीप भावसार असे या जुगार अड्डा चालवणाऱ्यांची नावे आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांनी 1 लाख 56 हजार 730 रुपये, दहा पत्त्यांची कॅट, यासोबत 1 लाख 41 हजार रुपये किंमतीचे 30 मोबाईल फोन, 14 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या 23 मोटार सायकली, 12 लाख रुपये किंमतीच्या 2 चारचाकी वाहने, 38 हजार रू. कि.चे टेबल खुर्च्या, असा एकूण 30 लाख 730 रू. किं.चा मुद्देमाल आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र नाशिक) डॉ.बी.जे.शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आता अनेकांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा – 46 ग्रॅम सोन्यासह, 1 लाख रुपये चोरीला; पाचोरा तालुक्यातील ‘या’ गावात जबरी चोरीची घटना
धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची बदली –
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच यानंतर आता एलसीबी पथकाची पथके आता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्वत: आपल्या हाती घेतली आहेत. धुळे शहर आणि जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे, सट्टा, मटका, जुगार, अवैध दारू, गुटखा, भांग, गांजा, इतर प्रकारचे गुन्हेगारीबाबत नागरिकांना माहिती असल्यास किंवा याबाबतची तक्रार द्यायची असल्यास त्यांनी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आवश्यकता असल्यास थेट माझ्याशी 9823511494 या क्रमांकावर संपर्क करता येईल, असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड केले आहे.