पैठण, 5 एप्रिल : श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार 2024 अयोध्येतील श्रीराम मंदिर समीतीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पं. कल्याणजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. पं. कल्याणजी गायकवाड हे ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ या कार्यक्रमाची विजेती ठरलेली कार्तिकी गायकवाड हिचे वडील आहेत.
काय आहे संपूर्ण बातमी? –
श्री एकनाथ महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याचे पैठण येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात अयोध्येतील श्रीराम मंदिर समीतीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गिरी जी महाराज यांच्या शुभ हस्ते . पं. कल्याणजी गायकवाड यांना श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराज यांचेच आशीर्वाद मानला जातो.
श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्काराने सन्मान –
पं. कल्याणजी गायकवाड यांनी बालवयापासूनच स्वरांची उपासना केली आहे. मोठ्या कष्टातून स्वरसाधना केली असल्याने वारकरी भजन क्षेत्रात त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अभंग-गौळणीच्या चालींनी लोकांना भुरळ घातली असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पैठण, आळंदी व पंढरपूरच्या वारीत भजनाची सेवा केली आहे. पं. कल्याणजी यांनी वारकऱ्यांपासून ते प्रसिद्ध गायकांपर्यंत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे कृष्णाई संगीत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पं. कल्याणजी गायकवाड यांनी हजारो गायक घडविले आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कंठ संगीत पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून आता यात आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे.
यांची होती उपस्थिती –
श्री एकनाथ महाराज पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॅा नामदेव महाराज शास्त्री, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमृताश्रम स्वामी (जोशी), भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज, पंढरपुर विठ्ठल रखुमाई संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. जळगावकर महाराज नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासह अनेक संत महंत मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक ह.भ.प. संत एकनाथ महाराज मिशनचे संस्थापक अध्यक्ष ह भ प योगिराज जी महाराज गोसावी यांचे यावेळी आभार मानण्यात आले.