छत्रपती संभाजीनगर, 25 जानेवारी : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज शनिवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म 1938 साली झाला होता. ते सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव येथील असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळे ते मूळचे बीडचेच झाले.
न्यायमूर्ती चपळगावकर हे वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी विपुल प्रमाणात वैचारिक लेखन केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी वृत्तपत्रातूनही दीर्घकाळ लेखन केले.
हैदराबाद संस्थानात नोकरी मिळेल या शक्यतेने त्यांचे पूर्वज बीडला म्हणजे हैदराबाद संस्थानात आले होते. पण पुढे याच कुटुंबाचा हैदराबाद मुक्तीसंग्राम, मराठवाड्यातील सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय वाटचालीत महत्त्वाचा वाटा राहिला. माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांच्या ग्रंथलेखनाची सुरुवात कायदेविषयक पुस्तकांनी झाली. त्यानंतर सुधीर रसाळ यांच्याबरोबर अनंत भालेराव यांच्या निवडक अग्रलेखांचे पुस्तक संपादित केले. त्याबरोबरच भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक त्यांनी लिहून प्रसिद्ध केले.
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे पार्थिव आज दुपारी त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणले जाईल. यानंतर सायंकाळी 4 वाजता त्यांची अत्यंयात्रा निघून प्रतापनगर येथे साडेचार वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि भक्ती, सायली व मेघना या तीन मुली व एक मुलगा आहे.
हेही वाचा – जळगाव रेल्वे अपघात प्रकरण: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट