पुणे – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा काल 85 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, शरद पवार आणि अजित हे पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहेत. यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर महाराष्ट्रात त्याची ताकद चांगली राहील, असे सुनंदा पवार म्हणाल्या आहेत.
काय म्हणाल्या सुनंदा पवार?
माध्यमांशी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या की, काल पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस होता. हा एक कौटुंबिक प्रसंग आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल हे सर्व त्यांना भेटण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यामध्ये काही राजकीय कारण असेल, असे मला वाटत नाही.
राजकारण करताना कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं हीसुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्यांचं बरोबर आहे. कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर महाराष्ट्रात त्याची ताकद चांगली राहील. त्यामुळे दादांसमोर, साहेबांसमोर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करते.
माझा आणि राजकारणाचा तसा काही संबंध नाही. मी सामाजिक क्षेत्रात मागील 35 वर्षांपासून काम करत आहे आणि प्रचार सोडला तर मी राजकारणात कुठेच अॅक्टिव्ह नसते. राजकीय व्यासपीठावरही मी कधी जात नाही. त्यामुळे राजकारणात साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा व्यक्तिश: त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. त्यामुळे ते दोन्ही विचार करुन निर्णय घेतील. याबाबत मला काही शंका वाटत नाही. पण याबाबतची चर्चा मी साहेबांसोबत किंवा दादांसोबत किंवा रोहितसोबत मी करत नाही.
केव्हाही फुटलेलं जे कुटूंब आहे, गेल्या कितीतरी पिढ्यांपासून आम्ही पवार कुटूंब एकत्र नांदतोय. सर्व सुखदु:खांमध्ये अडचणींमध्ये आम्ही एकत्र होतो. औद्योगिक, सामाजिक आम्ही स्वतंत्रपणे काम करतो. पण कुटूंब हे कुटूंब असते. ती कुटुंबाची ताकद होती. ती परत एकाठिकाणी यावी, असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसं मलाही वाटतं.
60 वर्ष ज्या माणसाने राजकारणात काढली आहेत, ज्याला तुम्ही राजकारणातले चाणक्य म्हणतात, शेवटी त्यांच्या मनात काय चालले आहे, हे त्यांच्या पत्नीलाही कळत नाही. त्यामुळे आम्हाला काय कळणार, हे सगळ्यात मोठं गूढ आहे. साहेब आणि दादा निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Uddhav Thackeray : ‘निवडणुकीपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का?’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा