जळगाव, 9 ऑगस्ट : बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जळगावातील पद्मावती मंगल कार्यालयात सकल हिंदू समाजाची आज दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी बांग्लादेशात हिंदू समाजावर अत्याचार केला जात असल्याचे सांगितले. तसेच केंद्र सरकारने योग्य व ठोस पाऊले उचलून हिंदू समुदायाला न्याय देण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, त्यांनी सकल हिंदू समाजाच्यावतीने जळगाव जिल्हा बंदची हाक दिली आहे.
जळगाव जिल्हा बंदची हाक –
महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, शेख हसीना यांनी राजीनामा दिल्या नंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर (हिंदु, शीख, बौद्ध, इत्यादी) जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भातील फोटो,व्हिडिओ बघून माणूस म्हणून मनाला वेदना होतात. या पार्श्वभूमीवर त्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाची बैठक पार पडली. तसेच या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी संपुर्ण जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येईल, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी सकल हिंदू समाजाच्यावतीने केले.
दरम्यान, त्यादिवशी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून हा बंद मौन स्वरूपाचा राहणार असून या बंदमध्ये कुठल्याही घोषणा देण्यात येणार नसून कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देखील खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी दिली.
अल्पसंख्यांक सुरक्षित झाले पाहिजे –
महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज पुढे म्हणाले की, बांगलादेशातील अल्पसंख्यांक सुरक्षित झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. बांगलादेशात लवकरात लवकर लोकशाहीचे सरकार स्थापन होऊन अल्पसंख्यांकाच्या सुरक्षिततेसाठी योग्य ते पाऊल उचलावे, यासाठी आमची केंद्र सरकारने अशी सूचना बांगलादेशच्या सरकारला करावी, अशी आमची विनंती आहे.
मानावधिकार आयोगाने भूमिका स्पष्ठ करावी –
तसेच महिला आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अत्याचारांवरून मानवाधिकार आयोगाने मौन सोडून या विषयांवर बोलले पाहिजे. मानावधिकार आयोगाने कुठलाही भेद न करता त्यांची भूमिका स्पष्ठ केली पाहिजे. बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदाय सुरक्षित राहील, असे प्रयत्न त्यांनी केले पाहिजेत, असेही महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज म्हणाले.
याप्रसंगी श्याम चैतन्य महाराज, महंत सुरेशदादा शास्त्री मानेकर बाबा, शास्त्री अनंत प्रकाश दास, हभप गजानन महाराज, शास्त्री स्वयंम प्रकाश दास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश नेहते, आदी उपस्थिती होते.
हेही वाचा : “लोकसभेत देवकरांनी आम्हाला मदत केली,” मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा, नेमकं काय म्हणाले?