जळगाव, 7 मे : दिवंगत पोलीस निरीक्षक दिलीप रावते यांच्या ज्येष्ठ सुकन्या तथा एरंडोल येथील रा. ति. काबरे विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त उपशिक्षक संतोष धनगर यांच्या स्नुषा सपना दिलीप रावते यांना छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात नुकतीच पीएच. डी. पदवी घोषित करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये कार्यरत प्रा. डॉ. विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतातील इंग्रजी लेखिका शशी देशपांडे, गीता हरिहरन, मंजू कपूर आणि शोभा डे यांच्या निवडक इंग्रजी कादंबऱ्यातील स्री पात्रांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास केला.
आई-वडील तथा सासू-सासर्यांची सेवा करून त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देवगिरी कॉलेजचे मार्गदर्शक प्रा. डॉ. विष्णू पाटील, अमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात कार्यरत प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कार्यरत प्रमोद गुलगुले यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर संशोधनासाठी त्यांना सोनाली पाटील, शीतल पाटील यांचे सहकार्य लाभले.