ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची काल 20 नोव्हेंबर रोजी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, आता शनिवार 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यादिवशी मतमोजणी कशापद्धतीने पार पडणार याबाबत पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भूषण अहिरे यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत दिली माहिती –
मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना भूषण अहिरे म्हणाले की, पाचोरा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निरीक्षक, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच सीआरपीएफ जवान तसेच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूमध्ये सील करण्यात आले आहेत. पाचोरा शहरातील गिरड रोड परिसरातील खत कारखान्यात 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार असून मतमोजणीचा निकाल लागेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी 14 टेबल तर पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी 8 टेबल तर ईटीबीपीएसच्या बॅलेट पेपरच्या मतमोजणीसाठी 4 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारसंघातील लढतीत असलेल्या 12 उमेदवारांना मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती व्हावी, यासाठी त्यांचे निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आल्याचे भूषण अहिरे यांनी सांगितले.
अशी असेल सुरक्षा व्यवस्था –
पाचोरा शहरातील गिरड रोड परिसरात असलेल्या एमआयडीसीच्या गोडाऊनवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी तीन टिअर मध्ये सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. पहिल्या टिअरमध्ये मुख्य भागात सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच दुसऱ्या भागात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात असणार आहेत. आणि बाहेरच्या भागात राज्य पोलीस दलातील कर्माचारी-अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहिती भूषण अहिरे यांनी दिली.
मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज –
गिरड रोड तीन दिवस बंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासन मतमोजणीच्या दिवशी गो. से. हायस्कूलला हे सुट्टी देण्याच्या तयारी आहेत. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि चांगल्या पध्दतीने मतमोजणी प्रक्रिया पार पडावी यासठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहितीही भूषण अहिरे यांनी दिली आहे.
मतदारांचे मानले आभार –
विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडले. याबाबत बोलताना भूषण अहिरे म्हणाले की, पाचोरा मतदारसंघात 3 लाख 33 हजार 860 अशा एकूण मतदारांपैकी 2 लाख 29 हजार 377 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी 68.70 इतकी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 63 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. आता मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 68.70 टक्के मतदान झाल्याने मागच्या तुलनेत पाच टक्क्याहून अधिक मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. दरम्यान, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान करत मतदानाचा टक्का वाढवल्याने मतदारांचे भूषण अहिरे यांनी आभार मानले.
हेही वाचा : Update : विधानसभा निवडणूक 2024; जळगाव जिल्ह्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी वाचा एका क्लिकवर